पालघर | 1 मार्च 2024 : पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुहेरी हत्याकांडाच्या घटनेमुळे पालघर हादरलं. तारापुर येथील कुडण येथे दोन व्यक्तींवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडसकीस आला. भीमराव पाटील आणि मुकुंद पाटील अशी मृतांची नावे आहेत. आरोपीने त्यांची हत्या केल्यानंतर आणखी एका इसमाच्या घरावरही हल्ला केलो होता. मारेकरी हा सायको किलर असल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्याबद्दल कळताच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी आरडाओरडा करताच आरोपी तेथून फरार झाला. हत्येनंतर तब्बल 150 पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधार्थ कार्यरत होते. अखेर आरोपी हा जवळच्या जंगलातील तलावातील दलदलीमध्ये लपून बसल्याची खबर पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी आरोपीला अथक प्रयत्नांनंतर अटक केली.
काय आहे प्रकरण ?
पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे कुडण गावात ही धक्कादायक घटना घडली. त्या गावात गेल्या काही दिवसांपासून एक अज्ञात इसम संशयास्पद रितीने फिरत होतो. स्थानिकांच्या माहितीनुसार, तो इसम मानसिकरित्या विक्षिप्त होता, त्यामुळे कोणी त्याची दखल घेतली, त्याच्याकडे लक्षही दिलं नाही. पण गुरूवारी रात्री गावात खळबळजनक प्रकार घडला. रात्री साडेनऊच्या सुमारास त्या युवकाने एका वृद्ध व्यक्तीवर कुदळीने वार करून त्याची हत्या केली आणि तो त्याच्या मृतदेहाजवळच बसून राहिला. त्या मृत इसमाचा भाऊ त्याला शोध तिकडे आला असता, आरोपीने त्याच्यावरही कुदळीने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या त्या इसमाचादेखील घटनास्थळीच मृत्यू झाला.
दलदलीत लपून बसला
भीमराव पाटील आणि मुकुंद पाटील अशी मृतांची नावे आहेत. या दुहेरी हत्येनंतर आरोपी तेथील आणखी एका व्यक्तीच्या घराजवळ गेला आणि दारावर कुदळीने वार केले. दरवाजा बंद होता, पण आतील लोकांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे रहिवासी धालत आले. ते पाहून आरोपी तिथून फरार झाला, अंधाराचा फायदा घेऊन तो पळून गेला आणि गावाबाहेर असलेल्या एका तलावाजवळील दलदलीत जाऊन तो लपला.
हत्येची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सुमारे 150 पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधार्थ निघाले. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी दलदलीत लपून बसलेल्या आरोपीला बाहेर खेचून काढले आणि अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.