नाशिक : नाशिकमध्ये मागील आठवड्यात एका प्राध्यापकाने नशेत भरधाव वेगाने कार चालवत चार जणांना चिरडले होते, त्यात दोघे गंभीर जखमी असल्याचे समोर आले आहे. अशातच दोन दिवस उलटून गेले तरी बेदरकारपणे कार चालवणाऱ्या प्राध्यापकाने कोणती नशा केली होती असा प्रश्न वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांना पडला होता. त्याचे कारण म्हणजे कार चालक साहेबराव निकम ही बेशुद्ध होते. त्यातच चांडक सर्कल जवळील निकम पुढे आणि पोलीस मागे असा थरार असल्याचा व्हिडिओ देखील समोर आला होता. त्यामुळे साहेबराव निकम यांनी नशेत केलेला कारनामा नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरत होता. सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर अशी कोणती नशा केली जी दोन दिवस झाले उतरत नाही ? असा सवाल उपस्थित करत नाशिककर उलटसुलट चर्चा करत होते.
तब्बल दोन दिवसांनी उशिरा साहेबराव निकम यांना शुद्ध आली, त्यांनंतर निकम यांना नाशिक पोलीसांनी अटक करत चौकशी केली.
त्यामध्ये निकम यांनी दिलेलं कारण ऐकून निकम यांचे कुटुंब सोडाच पोलीसही थक्क झाले होते, निकम यांनी सर्दी झाल्यानंतर झालेला कफ लवकर बरा व्हावा यासाठी ब्रँडी घेतल्याची कबुली दिली.
मद्यसेवन केलेल्या निकम यांनी सांगितलेले कारण ऐकून नातेवाईकही गोंधळून गेले आहे, कधीही मद्यसेवन न करणाऱ्या व्यक्तीने उपचार घेण्याऐवजी ब्रँडीच का घेतली असावी याचा विचार करत आहे.
गुरुवारी सायंकाळच्या वेळी निकम यांनी बीडको महाविद्यालयांपासून ते चांडक सर्कल पर्यन्त तब्बल सव्वा तास भरधाव वेगाने कार चालवत नाशिकमध्ये राडा केला आहे.
निकम यांच्या नातेवाइकांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार निकम हे मद्यसेवन करत नाही, कफ झाल्यामुळे त्यांनी ब्रँडी घेतली होती, त्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती देण्यात आली आहे.
त्यातच मद्य निकम यांना कुणी पाजले कि ते स्वतःच पिले याबाबत तपास करत असतांना अंदाज न आल्याने पाण्यापेक्षा मद्य अधिक झाल्याने निकम यांचा ताबा सुटल्याचे पुढे आले आहे.