बुलडाणा : बुलडाणा येथील बसस्थानकावर अनेकवेळा दारुडे धिंगाणा घालत असतात. पण आज एका दारुड्याने तर कहरच केला. तब्बल अडीच तास त्याचा धिंगाणा सुरू होता. त्याच्यापुढे फक्त महामंडळाचे कर्मचारीच नव्हे, तर पोलीस प्रशासनदेखील हतबल दिसून आले. या दारुड्याने चौकशी कक्षाच्या काचा फोडल्या. तसेच तेथील संगणकही फेकून दिले. त्यामुळे नियंत्रण कक्षातून चालणारे काम बऱ्याच वेळ थांबले होते. दारुड्याचा हा धिंगाणा पाहण्यासाठी बसस्थानकावर मोठी गर्दी जमली होती.
बुलडाणा शहरातील मिलिंद नगर भागात राहणारा 55 ते 60 वर्षीय सुरेश अवसरमोल आपल्या बायकोला हतेडी या गावी बसने सोडण्यासाठी बुलडाणा बसस्थानकावर आला होता. यावेळी तो दारुच्या नशेत होता. काही कारणावरून सुरेश आणि त्याच्या बायकोमध्ये वाद झाला. यावेळी सुरेशने आपल्या बायकोला बसस्थानकावरच मारहाण केली. ही मारहाण पाहून काही लोक वाद सोडविण्यासाठी गेले. तर सुरेशने त्यांनाही शिवीगाळ केली. त्यामुळे काही लोकांनी सुरेशला मारहाण केली.
यानंतर सुरेश रागाच्या भरात दिसेल त्याला शिवीगाळ करत नियंत्रण कक्षासमोर आला. त्याने तिथेच धिंगाना घालत नियंत्रण कक्षाच्या काचा फोडल्या. तसेच तिथले कम्प्युटर सुद्धा फेकून दिले. बसस्थानकावर हा धिंगाणा सुरू असताना बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळातच पोलीस कर्मचारी बसस्थानकावर पोहोचले आणि त्यांनी सुरेश अवसरमोलला समजविण्याचा प्रयत्न केला.
नियंत्रण कक्षासमोर उभारण्यात आलेल्या रॅलिंगमध्ये हैदोस घालणाऱ्या सुरेशला काही युवकांच्या मदतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण सुरेश कोणालाही जुमानत नव्हता. तो युवकांच्या तावडीतून सुटून पुन्हा रेलिंगमध्ये जाऊन बसला. तो पुन्हा धिंगाणा करू लागला. जवळपास दोन तास सुरेशचा बसस्थानकावर धिंगाणा सुरूच होता. याप्रकरणी पोलिसात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एसटी महामंडळाचे झालेले नुकसान देण्यास सुरेशच्या नातेवाईकांनी आश्वासन दिले असल्याची माहिती मिळत आहे.