अहमदनगर / 22 ऑगस्ट 2023 : संगमनेर येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल 80 कोटी 79 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे विशेष लेखा परिक्षकांनी पाच वर्षाच्या केलेल्या लेखा परिक्षणात उघड झाले आहे. याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, व्यवस्था पक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह एकूण 21 जणांच्या विरोधात संगमनेर शहर पोलिसात अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी लहानु गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते, अमोल प्रकाश क्षीरसागर यांना अटक केली आहे. मात्र पतसंस्थेचे चेअरमन व्यवस्थापक आणि कर्जदार मात्र फरार झाले आहे. दूधगंगा पतसंस्थेतील अपहार प्रकरणी मोठ्या प्रतीक्षेनंतर गुन्हा दाखल झाल्याने ठेवीदार आणि सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.
संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील दूधगंगा पतसंस्थेत सन 2016 ते 2021 या पाच वर्षांचे विशेष लेखा परीक्षक राजेंद्र निकम यांनी फेरलेखा परीक्षण केले. यात पतसंस्थेत 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी विशेष लेखापरीक्षक निकम यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्यामुळे ठेवीदारांनी संताप व्यक्त केला होता.
जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांनी शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीनुसार काँग्रेसचे माजी जिल्हापरिषद सदस्य आणि संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब दामोदर कुटे, भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ, भाऊसाहेब संतु गायकवाड (मयत), चेतन नागराज बाबा कपाटे, दादासाहेब भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, शकुंतला भाऊसाहेब कुटे, सोनाली दादासाहेब कुटे, कृष्णराव श्रीपतराव कदम, प्रमिला कृष्णराव कदम, अजित कृष्णराव कदम, संदिप दगडु जरे, लहानु गणपत कुटे, उत्तम शंकर लांडगे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते, अरुण के. बुरड आणि अमोल पांडुरंग क्षीरसागर यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. काही आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार केली आहेत. सर्व ठेवीदारांनी आपल्या ठेवींच्या पावत्या पुरावा म्हणून सादर कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.