नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणी ईडीने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. चिनी नियंत्रित कंपन्यांवर ईडीने छापे (ED Raid) टाकत त्यांच्या खात्यातील 9 कोटी रुपये गोठवले (Freeze) आहेत. याआधी, ईडीने पेटीएम, ईझबझ, रेझरपे आणि कॅशफ्रीच्या बँक खाती आणि आभासी खात्यांमध्ये ठेवलेले 46.67 कोटी रुपये गोठवले होते. गेल्या वर्षी नागालँड पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात ईडी मनी लाँड्रिंगची चौकशी करत आहे.
ईडीने HPZ लोन अॅप विरोधात दाखल असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात Comin नेटवर्क टेक्नोलॉजी प्रा. लि., मोबिक्रेड टेक्नोलॉजी प्रा. लि., मॅजिक डेटा टेक्नोलॉजी प्रा. लि., Baitu टेक्नोलॉजी प्रा. लि., Aliyeye नेटवर्क टेक्नोलॉजी इंडिया प्रा. लि., Wecash टेक्नोलॉजी प्रा. लि., Larting प्रा. लि., Magic Bird बर्ड टेक्नोलॉजी प्रा. लि., Acepearl सर्विसेज प्रा. लि. विरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला नोंदवला. या कारवाईत या कंपन्यांचे 9 कोटी रुपये फ्रीज करण्यात आले.
HPZ Token ही अॅप आधारित कंपनी आहे. या कंपनीने बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली वापरकर्त्यांना अधिक फायदे देण्याचे वचन दिले होते.
सुरुवातीला वापरकर्त्यांना HPZ Token F द्वारे कंपनीत गुंतवणूक केल्यास दुप्पट नफ्याचे आमिष दाखवले. वापरकर्त्यांकडून UPI आणि इतर पेमेंट गेटवेद्वारे पेमेंट घेण्यात आले. सुरुवातीला गुंतवणूकदारांना काही अंशी रक्कमही देण्यात आली.
उर्वरित रक्कम विविध पेमेंट गेटवे आणि बँकांद्वारे विविध व्यक्ती आणि कंपन्यांच्या खात्यात हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने 14 सप्टेंबर रोजी दिल्ली, गाझियाबाद, लखनौ, मुंबई, बिहारमधील गयासह सहा ठिकाणी छापे टाकले होते. याशिवाय, HPZ लोन अॅपविरोधात नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात ईडीने दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, जोधपूर आणि बंगळुरू येथील PayTM, Easebuzz, Razorpay आणि Cashfree या पेमेंट कंपन्यांच्या 16 ठिकाणी छापे टाकले होते.