छत्रपती संभाजीनगर | 12 ऑगस्ट 2023 : दोघा सुशिक्षित तरुणांनी मोबाईलच्या दुकानात चोरी केल्यानंतर त्याचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर या मुलांच्या पालकांनीच त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरातील जालनामध्ये उघडकीस आला आहे. डी-फार्मसी आणि आयटीआयमध्ये शिकत असलेल्या दोन मित्रांनी दारुच्या नशेत मोबाईलचे दुकान फोडत चोरी केल्याची कबूली दिली आहे. आपल्या मुलांचे पराक्रम पाहून पालकांना धक्का बसला असून त्यांनी थेट आपल्या मुलांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
आदित्य सुनील उघडे ( 19 वर्ष ) आणि अभिषेक राजू रिंढे ( 21 वर्ष ) या जालनातील इंदेवाडी राहणाऱ्या दोघा तरुणांनी ही चोरी केल्याचं उघडकीस आले. आदित्य हा फार्मसीचं शिक्षण घेत आहे तर अभिषेक हा आयटीआय करीत आहे. हे दोघांच्या घरची परिस्थिती चांगली आहे. त्यांनी दारुच्या नशेत रेणुका टेलीकॉम अँड मल्टी सर्व्हिसेस हे दुकान फोडून चोरी केल्याचे म्हटले आहे. त्यावेळी दुकानातील 40,000 रुपये रोकड, 10 स्मार्ट वॉच , 10 इयर बड्स , 5 चार्जर आणि मोबाईल्स असा एकूण 95,000 रुपयांचा माल चोरी केला. याप्रकरणी 30 जुलै रोजी दुकानमालक खर्डे यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
मोबाईल दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरीची दृश्य कैद झाली आहेत. हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि थेट मुलांच्या पालकांपर्यंत पोहचले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. व्हायरल व्हिडिओत चोरी करताना दिसणारी मुले आपलीच असल्याचं त्यांनी मान्य केले आणि दोघांनाही स्वत: पोलिस ठाण्यात हजर केले. यावेळी आरोपी अभिषेक आणि आदित्य या दोघांनीही पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. तसेच आपल्याकडून मोठी चूक झाल्याचेही मान्य केले आहे.