अनिल केऱ्हाळे, टीव्ही 9 मराठी, जळगाव : भोसरी एमआयडीसी भूखंड (Bhosari MIDC Plot) घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांची पुन्हा चौकशी होणार असल्याने त्यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर एकनाथ खडसे म्हणाले, भोसरी भूखंड प्रकरणी पुन्हा चौकशी म्हणजे कुठे ना कुठे नाथाभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न आहे. नाथाभाऊंना गुन्ह्यामध्ये अडकवल्यानंतरच निवडणुका सोप्या जातात, आत्तापर्यन्त चार ते पाच प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे, सुदैवाने न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल दिल्यामुळे आज मी बाहेर असल्याचे खडसे यांनी म्हंटले आहे. एकूणच खडसे यांनी भाजपवर नाव न घेता निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असतांनाच या चौकशा सुरू झाल्या होत्या, त्यात मात्र नंतरच्या काळात एकनाथ खडसे यांना अटक होईल अशी चर्चा देखील होती, मात्र खडसे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने अटकेची कारवाई टळली होती.
एकनाथ खडसे आता राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षामध्ये आहे, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
मात्र, पुन्हा राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आल्याने एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
एकनाथ खडसे यांची पुन्हा दिवाळीनंतर चौकशी होणार असल्याने निवडणुका जिंकण्यासाठीच मला अडकवले जात असल्याचा निष्कर्ष खडसे यांनी काढला आहे.
एकनाथ खडसे यांच्यावर पुणे येथील बंड गार्डन पोलीस ठाण्यात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता, त्याच प्रकरणी तक्रारदार यांच्या अर्जात ज्या मागण्या केल्या होत्या त्याची चौकशी न झाल्याचा आक्षेप तक्रारदार यांनी घेतला आहे.
त्यावरून पुन्हा चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने तपासी अधिकाऱ्यांना दिले असून दिवाळीनंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी चौकशी होणार आहे.