मध्यप्रदेश : होय ही घटना घडलीय मध्यप्रदेशमध्ये. एका चोराने ज्वेलर्सच्या दुकानात डल्ला मारला. एक मौल्यवान हार त्या चोराने चोरला. त्या ज्वेलर्सच्या मालकाने रीतसर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना जे दिसले त्याने पोलिसही चक्रावले. आता त्या चोरट्याचा शोध कसा आणि कुठे घ्यायचा या संभ्रमात पोलीस पडले आहेत. या घटनेची माहिती खुद्द मध्यप्रदेश केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी राजेश हिंगणकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. इंदूर पोलिस मुख्यालयात सध्या ते अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे आणि मुख्यालय) आहेत.
अधिकारी राजेश हिंगणकर यांनी ट्विट करून ही घटना सांगितली. ज्याने ही चोरी केली त्याचे नाव आणि त्याचा व्हिडिओही त्यांनी पोस्ट केला आहे. सोबतच त्या चोराला पकडण्यास पोलीस हतबल आहेत असेही ते म्हणाले आहेत. चोर दिसत आहे. त्याची ओळखही पटली आहे. पण, त्याच्यावर कसा आणि कोणता गुन्हा दाखल करायचा? कलमाखाली गुन्हा दाखल करायचा अशा विचित्र कात्रीत पोलीस सापडले आहेत.
पोलिसांची अशी अडचण का निर्माण झाली तर त्याचे उत्तर आहे की हा चोर दुसरा तिसरा कुणी नसून एक गलेलठ्ठ उंदीर आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यात ‘उंदीर’चोर ज्वेलर्स दुकानात मौल्यवान हाराची चोरी करून पसार होताना दिसत आहे. आता तो कोणत्या बिळात घुसला, कुठे गायब झाला याचा शोध कसा घ्यायचा, त्याने चोरलेला हार परत कसा मिळवायचा हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. म्हणजे सर्व साक्षीदार आणि पुरावे आहेत तरी खाकी निष्प्रभ ठरली आहे.
हार चोरी करताना उंदीर कॅमेऱ्यात कैद
#अब ये चूहा डायमंड का नेकलेस किसके लिए ले गया होगा…. pic.twitter.com/dkqOAG0erB
— Rajesh Hingankar IPS (@RajeshHinganka2) January 28, 2023
अधिकारी राजेश हिंगणकर यांनी ट्विटर हँडलवरून ट्विट केलेला हा 30 सेकंदाचा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे. एक लाखाहून अधिक व्ह्यूज त्याला मिळाले आहेत. ‘अब ये चूहा डायमंड का नेकलेस किसके लिए ले गया होगा…’ या शीर्षकाखाली हा व्हिडिओ पोस्ट केला असून त्याला आलेल्या कमेंट्सही खूप मजेदार आहेत. एका युजरने ‘त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला छछुंदरसाठी नेले असावे’ असे लिहिले आहे. तर, तेजांशू पांडे याने ’14 फेब्रुवारी (व्हॅलेंटाइन डे) ची ही तयारी असू शकते.’ असे म्हटले आहे.
ट्विटर हँडल महेश शर्मा याने ‘मुझे नौलखा मंगा दे रे औ नंदी के बिरा’ असे लिहिले आहे. दुसर्या ट्विटर हँडलरने ‘देशातील प्रतिष्ठित ठग विजय मल्ल्याचा हा नवा लूक सर्वांनाच थक्क करून सोडणार आहे. भारतातील सर्व बँकांनी त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवली पाहिजे.’ अशी खिल्ली उडवली आहे. शिवाय एका ट्विटर हँडलरने पती असो किंवा उंदीर यांच्याकडून एक कळले की सर्वांची अवस्था सारखीच आहे, असे म्हटलंय.