“लाळघोटे, धोकेबाज लोकांना मी …”, CEO, MD ला मारणारा ‘जोकर’ मॉडल, रॅपर झाला किलर

| Updated on: Jul 12, 2023 | 8:38 PM

Marathi Crime News | माणूस रागाच्याभरात कधी काय करेल सांगता येत नाही, त्याचा अंदाजही लावता येत नाही. एका कंपनीतील मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीएओला आपल्या जीवाला मुकावं लागलंय.

लाळघोटे, धोकेबाज लोकांना मी ...,  CEO,  MD ला मारणारा जोकर मॉडल, रॅपर झाला किलर
Follow us on

बंगळुरु | व्यवसायात हस्तक्षेप करत असल्याच्या रागातून माजी कर्मचाऱ्याने टेक कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओचा काटा काढला. या माजी कर्मचाऱ्याने केबिनमध्ये घुसून तलवारीने सपासप वार केले. यानंतर या दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याआधीच दोघांनी जगाचा निरोप घेतला. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. फणींद्र सुब्रमण्यम आणि सीएओ वीनू कुमार अशी या मृतांची नाव आहेत. सुब्रमण्यम आणि कुमार या दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. हे दोघे एरोनिक्स इंटरनेट कंपनीचे कारभार पाहत होते. हल्ला केल्यानंतर हा हल्लेखोर पसार झाला”, अशी माहिती उत्तर पूर्व बंगळुरुचे डीसीपी लक्ष्मी प्रसाद यांनी ही माहिती दिली.

पोलिसांनी सीईओ आणि एमडी हत्या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. मुख्य आरोपी हा टेक क्षेत्राशी संबंधित होता. या मुख्य आरोपीचा व्यवसायात सुब्रमण्यम आणि कुमार हस्तक्षेप करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, सुब्रमण्यम आणि कुमार हे दोघेही ऑफीस केबिनमध्ये बसले होते. तेव्हा हा माजी कर्मचारी असेलला आरोपी फेलिक्स तलवार घेऊन केबिनमध्ये घुसला. त्यानंतर फेलिक्सने दोघांवर तलवारीने सपासप वार केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनी रुग्णालयात पोहचण्याआधीच जगाचा निरोप घेतला. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी पंचनाम्याला सुरुवात केली.

ही सर्व घटना मंगळवारी भरदिवसा बंगळुरुतील अमृतल्ली भागातील एका खासगी कंपनीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जे फेलिक्स उर्फ जोकर हा एक टिकटॉक स्टार आहे. टिकटॉक बंद झाल्यानंतर हा इंस्टाग्रावर आला. जे फेलिक्स याचे असंख्य फॉलोअर्स आहेत. फेलिक्सने एरोनिक्स कंपनीला रामराम ठोकत स्वत:ची कंपनी सुरु केली होती.

या सर्व घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलीस हल्लेखोराचा शोध घेत होती. तर दुसऱ्या बाजूला हा फेलिक्स सोशल मीडियावर पोस्ट करण्यात बिजी होता. या दोघांना संपवल्यानंतर फेलिक्स इंस्टावर एक स्क्रीनशॉट शेअर करत होता. इतकंच नाही, तर या हत्याकांडाआधी एक मेसेज दिला होता. “या ग्रहावरील माणसं ही धोकेबाज आणि फसवणूक करणारे असतात. त्यामुळे मी या ग्रहावरी लोकांना मारलंय. मी फक्त वाईट लोकांना त्रास देतो. मी कधीच चांगल्या लोकांना त्रास दिलेला नाही”, असं या मेसेजमध्ये म्हटलेलं.

मॉडेलिंग, रॅपर आणि फॅशन शो

फेलिक्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वत: कन्नड रॅपर असल्याचं लिहिलंय. फेलिक्सने काही रॅपचे व्हीडिओही पोस्ट केले आहेत. इतकंच नाही, तर हा फेलिक्स फॅशन शोमध्ये सहभागी व्हायचा.

हत्येचं सविस्तर कारण काय?

फणींद्र आणि वीनू या दोघांनी नोव्हेंबर 2022 मध्ये एरोनिक्स मीडिया प्रायव्हेट कंपनीची स्थापना केली. बन्नेरघट्टा रोड परिसरात या कंपनीची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर या दोघांनी राजीनामा दिला. पुढे दोघांनी एयरोनिक्सची सुरुवात केली. फेलिक्सची कंपनी डबघाईला आली होती. फेलिक्सच्या कंपनीला आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत होता. आपल्याला होणाऱ्या आर्थिक तोट्याला फणींद्र आणि वीनू हे दोघे जबाबदार असल्याचं समज फेलिक्सचा होता.

घटना घडली तेव्हा नक्की काय झालं?

ही सर्व घटना दुपारी 3.30 ते 4 दरम्यान घडली. तेव्हा जवळपास 10 कर्मचारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितानुसार, ” शबरीश आणि त्याचे 2 मित्र हे दुपारी 3 च्या आसपास ऑफिसमध्ये आले. या दोघांनी फणींद्र आणि वीनूबाबत चौकशी केली. मात्र त्याआधीच दोघे निघून गेले होते. यामुळे फेलिक्सचे मित्र हे फणींद्र आणि वीनू या दोघांची ग्राउंड फ्लोअरवरील वेटिंग रुममध्ये वाट पाहत होते. काही मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर फणींद्र आणि वीनू दोघे आले. त्यानंतर हे सर्व पहिल्या मजल्यावरील एमडी रुममध्ये गेले.

जवळपास हे सर्व 15-20 मिनिटं रुममध्ये होते. एमडी रुममधून आरडाओरडा सुरु झाला. त्यानंतर आम्ही खाली पळून गेलो. या दरम्यान आम्ही तिथे पाहण्याचा प्रयत्न केला.तेव्हा तिथे तिघेजण वीनू आणि फणींद्र यांच्यावर हल्ला करत होते. हे सर्व पाहून आम्ही वीनू आणि फणींद्र यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला फेलिक्स आणि त्यांच्या मित्रांनी जीवे मारण्याची धमकी दिली”.