उन्नाव : उन्नावमध्ये एका निवृत्त सैनिकाने किरकोळ वादातून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर गुन्ह्याचा कुणालाही मागमूस लागू नये, तसेच पुरावा कुणाच्या हाती लागू नये म्हणून पत्नीचा मृतदेह तब्ब्ल 7 फूट खोल खड्डा खोदून त्यात पुरला. या धक्कादायक घटनेचा उलगडा झाल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपी निवृत्त सैनिकाला पोलिसांनी अटक केली आहे. राम लखन सिंह असे या आरोपी माजी सैनिकाचे नाव आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. आरोपी निवृत्त सैनिक राम लखन याला अटक केली आहे. तसेच पुढील तपास आणि कारवाई सुरु आहे. आरोपी राम लखनने हत्येची कबुली दिली आहे.
इंद्र नगरचा रहिवासी असलेला आणि लष्करातून निवृत्त झालेला राम लखन सिंह हा सध्या ग्वाल्हेरमधील एका खासगी कंपनीत काम करायचा. त्याची पत्नी संतोष सिंह ही उन्नावच्या इंद्र नगरमध्ये राहत होती. राम लखनला दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो दारूच्या नशेत घरी आल्यानंतर त्यांच्या कुटुंबात दररोज भांडणे होत होती, अशी माहिती प्राथमिक पोलीस तपासात समोर आली आहे.
मृत महिला संतोष हिला भेटण्यासाठी तिची भाची घरी आली होती. मात्र ती संतोषच्या घरी पोचली, तेव्हा तिला घराला कुलूप लावल्याचे दिसले तसेच शेजारी पाळीव कुत्रा मेलेला दिसला. त्यावर भाचीला काहीतरी अनुचित घडल्याचा संशय आला. तिने लगेचच 112 नंबर डायल करून पोलिसांना बोलावले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून कुलूप तोडले आणि घराची झडती घेतली. मात्र तेथे घरात त्यांना काहीही संशयास्पद सापडले नाही.
यानंतर घराबाहेर बांधकाम सुरू असलेल्या जागेत संशयाच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली. त्यावेळी त्यांना त्या परिसरात खोदकाम करण्यात आल्याचे समजले. तेथील जागेवर पुन्हा खोदकाम केले असता, तब्बल 7 फुटांवर संतोषचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.