नवी मुंबई / 29 जुलै 2023 : एखाद्या चित्रपटात शोभेल अशी घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी असल्याची बतावणी करत पीडब्लूडीच्या निवृत्त अधिकाऱ्याला 36 लाखांचा चुना लावल्याची घटना नवी मुंबईतील ऐरोलीत उघडकीस आली आहे. सहा जणांच्या टोळीने घराची झडती घेत मुद्देमाल नेला. कांतिलाल यादव असे लुटण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींचा शोध घेण्याचे मोठो आव्हान पोलिसांसमोर आहे.
कांतिलाल यादव या निवृत्त अधिकाऱ्याच्या घरी 21 जुलै रोजी सहा जण गेले. त्यांनी आपण अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी असल्याची बतावणी केली. मग त्यांच्याविरोधात तक्रार आली असून घराची झडती घेण्यास आल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपींपैकी एकाने यादव आणि त्यांच्या पत्नीचा मोबाईल काढून घेतला आणि झडती पूर्ण होईपर्यंत आपल्या जवळ बसण्यास सांगितले. यानंतर यादव यांच्या पत्नीकडून तिजोरीच्या चाव्या काढून घेतल्या. यादव यांनी एका आरोपीला त्याचे ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. मात्र आरोपीने झडती पूर्ण झाल्यावर ओळखपत्र दाखवतो असे सांगितले.
यानंतर त्याच्या पाच साथीदारांनी तीन बेडरूममधील तीन तिजोऱ्यांची झडती घेतली. तिन्ही तिजोरीत मिळून 25 लाख रुपये, 3.80 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन, अंगठी आणि एक ब्रेसलेट असा एकूण 4.20 लाख रुपयांचा ऐवज, तसेच 40,000 रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी, 80,000 रुपये किमतीचे हिरेजडीत सोन्याचे मंगळसूत्र आणि 10,000 रुपये किमतीची दोन घड्याळे जप्त केली. शिवाय कपाटातील मौल्यवान वस्तू चामड्याच्या पिशवीत भरून आरोपींनी पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच यादव यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.