नाशिक : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून बनावट नोटा देऊन फसवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. नाशिकच्या सिडको परिसरातील उपेंद्रनगर येथे पाचशे रुपयांची बनावट नोट देऊन भाजी विक्रेत्याला फसवणूक केल्याची घटना ताजी असतांना पुन्हा सिडको परिसरात पाचशे रुपयांची बनावट नोट देऊन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. मागील घटनेत भाजी विक्रेत्या पुरुषाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली होती. आता एका भाजी विक्रेत्या एका महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. गंगूबाई साळवे या आज्जीकडून चाळीस रुपयांचा भाजीपाला विकत घेतला. त्यात पाचशे रुपयांची बनावट नोट देऊन उर्वरित चारशे साठ रुपये परत घेतले. मात्र, थोड्या वेळाने पाचशे रुपयांची नोट नसून कागदावर कलर प्रिंट काढल्याचे साळवे यांच्या निदर्शनास आले. आपली बनावट नोट देऊन फसवणूक केल्याची बाब काही वेळातच लक्षात आल्याने भाजी बाजारात मोठी खळबळ उडाली होती.
दोनच दिवसापूर्वी अशीच घटना नवीन नाशिकच्या उपेंद्रनगर परिसरात घडली होती. चाळीस रुपयांचा भाजीपाला घेत बनावट पाचशे रुपये देऊन उर्वरित चारशे साठ रुपये हातात घेऊन पसार झाला होता.
लाल रंगाचे स्वेटर घालून ही व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन बनावट नोटा देऊन फसवणूक करत असल्याची बाब निदर्शनास आली असून भाजी विक्रेते यांच्यात खळबळ उडाली आहे.
बनावट नोटा देऊन भाजी विक्रेत्यांना लक्ष करणारा भामटा परिसरातीलच असल्याचा संशय नागरिकांना असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीसांनी शोध घ्यावा अशी मागणी होऊ लागली आहे.
उपेंद्रनगर येथील घटना ताजी असतांना लेखानगर येथे गंगूबाई साळवे यांची सारखीच फसवणूक झाल्याने भाजी विक्रेत्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून कारवाईची मागणी केली जात आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी इडली विक्रेत्याकडे पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली होती, कालिकेच्या यात्रेत घडलेल्या या घटनेचा तपास पोलीसांनी लागलीच लावला होता.
नाशिकच्या नवीन नाशिक परिसरातील उपेंद्रनगर आणि लेखानगर येथे घडलेला प्रकार पोलिसांचीही दिशाभूल करणारा असून भाजी विक्रेत्यांना लक्ष केल्याने मोठी चर्चा होऊ लागली आहे.
त्यामुळे येत्या काळात आता नाशिक शहर पोलीस या भामट्याला बेड्या ठोकून भाजी विक्रेत्यांना दिलासा देतील का ? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.