आयपीएलसारखा (IPL 2022) हुबेहूब सेटअप करत सट्टा लावणाऱ्या रॅकेटचा गुजरातमधून (Gujrat IPL Racket) पर्दाफाश करण्यात आला होता. सोमवारी याबाबतचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर अवघ्या काही तासांच्या फरकाने आता अशीच कारवाई यूपीतही करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे यूपीतील बोगस आयपीएलवरही (Fake IPL racket) रशियातून सट्टा लावला जात असल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी पोलिसांनी याबाबतची कारवाई केली. विशेष म्हणजे गुजरात आणि यूपी या दोन्ही ठिकाणी सुरु असलेल्या बनावट आयपीएलचा मास्टरमाईंड एकच असल्याचंही समोर आलंय. आता या बोगस आयपीएल रॅकेटचं जाळ देशभर पसरलेलं असू शकतं, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यानुसार पोलिसांकडून पुढील तपास आणि कारवाई केली जाते आहे. दरम्यान, गुजरात प्रमाणे यूपीमध्येही सारखीच पद्धत वापरुन रशियातून सट्टा लावला जात होता. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी याबाबत कारवाई केली आहे. टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलंय.
उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील हापूरच्या पोलिसांनी या कारवाईबाबत अधिक माहिती दिली. मेरठच्या सुधा क्रिकेट ग्राऊंजवर चार दिवसांपासून सामने खेळवले जात होते. पंजाब बिग बॅश लीग नावाने आरोपी सामने खेळवत होता. या लीगमध्ये फसवणूक करुन मॅचवर सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापेमारी करत शिताब झहीद आणि रिषभ धनेष या दोघांना अटक केली आहे. शिताब हा मेरठमध्येच राहणारा असून रिषभ हा ग्वालिअरचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
विशेष म्हणजे आता या कारवाईनंतर पोलिसांना बोगस आयपीएलचं हे रॅकेट देशभर पसरलेलं असू शकतं, अशी शंका आहे. त्यामुळे इतर राज्यांमध्येही आता पोलिसांनी आपला तपास करण्यास सुरुवात केलीय. सोमवारीच गुजरातमध्ये बोगय आयपीएलप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी चौघांना अटक केली होती. गुजरातच्या एका गावात मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किग्स, गुजरात टायटन्स आणि इतर आयपील संघाच्या जर्सीप्रमाणे कपडे खेळाडूंना देऊन सामने खेळवले जात होते. मॉस्को आणि युरोपीयन शहरांमधून या सामान्यांवर बेटिंग खेळलं जात होतं.
एका शेतात हे सामने गुजरातमध्ये खेळवले जात होते. या सामन्यांचं युट्युब थेट प्रक्षेपण केलं जात होतं. इतकंच काय तर हर्षा भोगले सारखा आवाजा काढून कॉमेन्ट्री करणाराही भामट्यांनी कामाला ठेवला होता. मॅचवेळी असणाऱ्या गर्दीचा बँग्राऊंड साऊंड इफेक्टही मॅचवेळी चालवला जात होता. रशिया आणि आसपासच्या शहरांमधून या मॅचेस वर पैसे लावले जात असल्याचीही माहिती समोर आली आहे. आतापर्यंत ताब्यात घेतलेल्यांची पोलिसांकडून आता कसून चौकशी केली जातेय.