मावळ तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंडित जाधव यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याची अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींची क्रूरता एवढ्यावरच थांबली नाही तर हत्येनंतर त्यांनी पंडित यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणयासाठी मारेकऱ्यांनी त्यांचा मृतदेह जाऊन टाकला. मात्र त्यानंतर त्यांचे अपहरण खंडणीसाठी झाल्याचा बनाव रचण्यात आला. याप्रकरणी तळेगाव MIDC पोलिसांनी आणि खंडणी विरोधी पथकाने आरोपींना बेड्या ठोकून अटक केली.
असा उघड झाला गुन्हा
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत पंडित जाधव हे 14 नोव्हेंबर पासून बेपत्ता होते. आरोपींनी त्यांचे अपहरण केले आणि नंतर त्यांच्याच मोबाईलवरील व्हाट्सॲपचा वापर करून त्यांच्या कुटुंबियांकडून 50 लाखांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पंडीत जाधव यांच्या बंद मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले, तसेचच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. त्या तपासात आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांसमोर सूरज वानखेडे या तरूणाचं नाव समोर आलं. अखेर पोलिसांनी कसून तपास करत सूरज याच्या मुसक्या आवळल्या. तो गावाला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला बेडया ठोकल्या.
आरोपीकडून गुन्हा कबूल
पोलिसांनी चौकशीदरम्यान खाक्या दाखवताच सूरजने त्याचा गुन्हा कबूल केला. सूरजने त्याचा मित्र रणजित( रा. बिहार) याच्यासोबत प्रसिद्ध बैलगाडा मालक पंडीत जाधव यांचे अपहरण केलं. त्यांच्या कुटुंबियांकडून लाखोंची खंडणीही मागितली. त्यानंतर 14 नोव्हेंबरच्या रात्री तळेगाव एमआयडीसी परिसरात वैयक्तिक कारणावरून दोरीने गळा आवळून खून केला.
त्यानंतर आरोपी कुटुंबियांकडे गेले आणि पंडीत जाधव यांनी त्यांची फॉर्च्युनर गाडी मागितली असल्याचे सांगत, ते गाडी घेऊन गेले. त्याच कारमध्ये पंडीत जाधव यांचा मृतदेह टाकला आणि वहागाव (ता. खेड) येथील डोंगरावर मृतदेह जाळून विल्हेवाट लावली. एवढंच नव्हे तर मृतदेहाची विल्हेवाट लावल्यावर त्यांची गाडी पुन्हा जाधव यांच्या घराच्या परिसरातच लावल्याचेही तपासात निष्पन्न झालं. अखेर तळेगाव MIDC पोलिसांनी आणि खंडणी विरोधी पथकाने दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्यात.