लंडन : मुलीच्या हत्येनंतर (murder of daughter) तिच्या वडिलांना 8 शब्दांत एक संदेश (message) पाठवला होता, जो त्यांना कधीच विसरता येणार नाही. आता आमचं कुटुंब नेहमीच अपूर्ण राहील, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मुलीची एका कार चालकाने निर्घृण हत्या केली आहे. रेबेका स्टिअर असे त्या मुलीचे नाव असून स्टीफन नावाच्या व्यक्तीने त्याच्या कारने तिला धडक दिली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात तर नेण्यात आले, पण दुर्दैवाने तेथे तिचा मृत्यू झाला.
एक्सप्रेस यूकेच्या वृत्तानुसार, स्टीफनला शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने सुमारे सात महिन्यांपूर्वी इंग्लंडमधील श्रॉपशायरमध्ये फुटपाथवर असलेल्या लोकांच्या अंगावर गाडी चढवली होती. त्या दुर्दैनी दिवसाचे वर्णन करताना रेबेकाच्या वडिलांनी सांगितले की, जेव्हा त्यांना त्यांची मुलगी जखमी झाल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांना या घटनेबद्दल सांगितलेले 8 शब्द ते कधीही विसरू शकणार नाहीत.
Get to town as fast as you can ( लवकरात लवकर तुम्ही शहरात पोहोचा) असा मेसेज त्यांना मिळाला होता. त्यांची मुलगी रेबेका जखमी झाली असून ती श्वासोच्छ्वास करत नाहीये, असेही त्यांना कळले होते.
रेबेकाला बनायचे होते डिटेक्टिव्ह
गेल्या काही महिन्यांत रेबेकाच्या कुटंबाचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे. रेबेका ही विद्यापीठात शेवटच्या वर्षात शिकत होती. तिला डिटेक्टिव्ह अर्थात गुप्तहेर बनायचे होते. मात्र आता ते केवळ एक स्वप्नच राहील.
‘ तिला जी गोष्ट करण्याची खूप इच्छा होती, ती आता कधीच होणार नाही. ती (रेबेका) कधीही गुप्तहेर बनू शकणार नाही. ना तिचं कधी लग्न होईल ना मुलं जन्माला येतील. आम्ही नातंवडांचा चेहराच काय आमच्या लेकीलाच कधी पाहू शकणार नाही. आम्ही कुटुंब पुन्हा कधीच आधीसारखं होणार नाही, काहीच पूर्ववत होणार नाही ना ! आमच्या कुटुंबात एक पोकळी निर्माण झाली आहे. अशी पोकळी जी कोणीच भरून काढू शकणार नाही… आमच्या सुंदर मुलीची जागा कोणीही घेऊ शकणार नाही, अशा शब्दात रेबेकाच्या वडिलांनी त्यांचे दु:ख व्यक्त केले.
गेल्या वर्षी 9 ऑक्टोबर रोजी झालेल्या या अपघातात 18 वर्षीय काइल रॉबर्ट्सही जखमी झाला होता. स्टीफन या दोषी व्यक्तीने फूटपाथवर मुद्दाम त्याची कार घुसवली होती आणि निष्पाप लोकांना चिरडले होते.