मुंबई / ब्रिजभान जैस्वार (प्रतिनिधी) : मुंबई सत्र न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह कुंडलेस यांना न्यायालयाचा झटका बसला आहे. हरभजन सिंह कुंडलेस यांच्या विरुद्ध सुरू असलेली फरार घोषित करण्याची प्रक्रिया रद्द करण्यासाठीची याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. शिवडी कोर्टाने 30 जानेवारीला कुंडलेस यांच्या विरुद्ध फरार घोषित करण्याची प्रक्रिया शुरू केली होती. याप्रकरणी आरोपपत्र दाखल होऊन देखील कुंडलेस बहुतेक वेळा सुनावणीला गैरहजर राहिले. एवढेच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढून देखील त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. असं असताना शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने अखेर त्यांच्या विरोधात फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली.
या प्रकरणी जर कुंडलेस महिनाभरात कोर्टासमोर हजर न झाल्यास त्यांची मालमत्तेची जप्ती देखील केली जाऊ शकते. दरम्यान या फरार घोषित करण्याच्या प्रक्रिये विरुद्ध सत्र न्यायालयात दाद मागत अटक होण्याच्या भीतीपोटी आपण कोर्टासमोर येत नसल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं होतं.
2014 सालापासून सुरू असलेल्या खोट्या जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजन सिंह कुंडलेस हे दोघे आरोपी असून, त्यांच्या विरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालय गाठलं. येत्या काही दिवसात या प्रकरणाचा अंतिम निकाल येणे अपेक्षित आहे.