मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : मुंबईच्या वांद्रे ते वरळी सी-लिंकवर एका विना हॅल्मेट भरधाव मोटरसायकल चालविणाऱ्या एका महिलेचा पोलिसांना शिवीगाळ करणारा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या महिलेला ट्रॅफीक पोलिसांनी बेकायदा सी-लींकवर मोटरसायकल चालविण्याच्या गुन्ह्याप्रकरणी रोखले तर तिने अर्वाच्च भाषेत पोलीसांशी हुज्जत घातल्याचे व्हिडीओत दिसत आहे. ही बुलेटस्वार महिला पेशाने आर्किटेक्ट असून तिच्यावर सरकारी कर्मचाऱ्याला शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा, वाहतूक नियमांनूसार गुन्हा दाखल केला आहे.
वांद्रे सी-लिंकवर मोटरसायकल चालविण्यास बंदी आहे. ही महिला मोटरसायकलीवर विना हॅल्मेट वेगाने दुचाकी चालवित दक्षिण मुंबईत जाताना दिसल्याने पोलिसांनी तिला अडविले. तिला रोखल्याने तिने वाहतूक पोलिसांवर आगपाखड केली. तिने बाईक थांबवायलाही नकार तिला. एवढेच काय माझी गाडी रोखायची हिंमत कशी झाली. पोलिस या महिलेबद्दल त्यांच्या वरिष्ठांना कळवित असताना तिला बाईकचे इंजिन बंद करण्यास सांगितले असता तिने, कोणाला बोलवणार,जर नरेंद्र मोदींनी मला कॉल केला तरच मी बाईक थांबवेल, करा नरेंद्र मोदींना फोन अशी धमकीच तिने पोलिसांना दिली.
हाच तो व्हिडीओ –
जेव्हा या महिलेवर कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली तेव्हा तिने शिवीगाळ केली, ती पोलिसांना म्हणाली की हात काटके रख दुंगी, हिमंत कशी झाली माझ्या गाडीला हात लावायची. पोलिसांनी सांगितले की वांद्रे सी-लिंकवरील सिक्युरिटी स्टाफने पोलिसांकडे या महिलेची तक्रार केली. या महिलेचे नाव नुपुर मुकेश पटेल असे आहेत. ती वांद्रे सी -लिंकहून दक्षिण मुंबईच्या दिशेने चालली होती.
गुन्हा दाखल आणि नोटीस दिली
पोलीसांनी तिला अडविले तेव्हा ती म्हणाली की रोड तुमच्या बापाचा नाही. मी टॅक्स भरते मला रोडवर गाडी करण्याचा अधिकार आहे. तिने रस्त्यामध्येच गाडी उभी करीत ट्रॅफीक पोलिसांशी बराच वेळ वाद घातला. तिने अनावश्यक वाद घातला आणि पोलिसांना धक्काही दिला असे पोलिसांनी सांगितले. पटेल ही मध्यप्रदेशातील जबलपूरची मूळची रहीवासी असून तिची बुलेट तेथील एका रिअल इस्टेट फर्मच्या नावाने रजिस्टर आहे. तिला सीआरपीसी कलम 41 ए अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. तिला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर रहाण्याचे आदेश देऊन तिला समज देऊन सोडण्यात आले आहे.