अश्विनी सातव, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, (Amit Shah) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लील मेसेज केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे. पुणे येथील शिवाजीनगर येथे असलेल्या सायबर पोलीस (Cyber Police) ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबूकवर पोस्ट केलेल्या मेसेज प्रकरणी भाजप पुणे शहर सोशल मीडिया अध्यक्ष विनित बाजपेयी यांनी रामदास शिर्के यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यावरून रामदास शिर्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबूकवर हिंदू एकता या नावाने असलेल्या ग्रुपवर रामदास शिर्के यांनी मेसेज केला होता. त्यात अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर असल्याने त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली जात आहे.
फेसबूकवर असलेल्या हिंदू एकता या ग्रुपवर देशाचे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याबाबत मजकूर होता.
याबाबत पुणे येथील भाजपचे पुणे शहर सोशल मीडिया अध्यक्ष विनित बाजपेयी यांनी याबाबत पुणे येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
सायबर विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम.पाटील यांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास केला जात असून अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
आरोपीचा लवकरात लवकर शोध लागावा.या करीता फेसबुककडे लेखी तक्रारी केली असून त्यांच्याकडून आरोपीबाबत माहिती मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
एकूणच सोशल मीडियावर अलीकडे सर्रासपणे पोस्ट करून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यात अशा स्वरूपात काही व्यक्तींना अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्ट केल्याने काहींवर तरुंगात जाण्याची वेळ येते.