मुंबई : बीएमसी अधिकारी असल्याचे भासवत प्रख्यात डॉक्टर आणि दुकानमालकांकडून ऑनलाइन पैसे उकळल्याचे उघडकीस आले आहे. तसेच परवानगीशिवाय त्यांच्या आस्थापनाबाहेर नावाचे फलक लावल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकीही दिली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटने ही कारवाई केली. आरोपींविरोधात वांद्रे आणि खार येथील पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेक बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) अधिकाऱ्यांची टोळी सक्रिय असल्याची विशिष्ट माहिती गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने तपास सुरु केला. तपास केल्यानंतर गुन्हे शाखेने तिन्ही आरोपींना अटक केली. आरोपींनी याआधी असे गुन्हे केले असल्याचे आढळून आले होते.
गुगल पे या मोबाईल पेमेंट सेवेचा एक्झिक्युटिव्ह म्हणून भासवणाऱ्या एका फसवणुकदाराने नागपुरातील एका ६५ वर्षीय व्यक्तीची ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे शहर पोलिसांनी मंगळवारी पीटीआयला सांगितले. राणा प्रताप नगर येथील रहिवासी असलेल्या सुरेंद्र बोऱ्हा यांनी ऑनलाइन ऑर्डर केलेल्या औषधांसाठी 1,200 रुपयांऐवजी 2,500 रुपये चुकून दिले. चूक लक्षात आल्याने त्याने गुगल पे ग्राहक सेवा क्रमांक ऑनलाईन शोधला.
10 जून रोजी त्यांचा Google Pay ग्राहक सेवेचा एक्झिक्युटिव्ह असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा कॉल आला. त्याच्यावर विश्वास ठेवून, बोऱ्हा यांनी सूचनांनुसार त्यांचे बँक तपशील शेअर केले आणि त्याच्या मोबाईल फोनवर AnyDesk अॅप डाउनलोड केले. यानंतर आरोपीने त्यांच्या खात्यातून परवानगीशिवाय 4 लाख रुपये ट्रान्सफर करुन घेतले. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.