नाशिक : नाशिकच्या पोलीसांना (Nashik Police) नेमकं झालंय तरी काय असं म्हणण्याची वेळी वारंवार येते आहे. त्याचं कारण म्हणजे वारंवार पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी लाचलुचपत (ACB) विभागाच्या जाळ्यात अडकले जात आहेत. नुकतेच मालेगाव (Malegaon) येथे लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली आहे. त्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी आणि एका सामाजिक कार्यकर्त्याचा समावेश आहे. एमडी पावडर या नशेच्या अंमली पदार्थांशी संबंधित असल्याच्या संशयावरून दोघांवर कारवाई करू नये या तडजोडीसाठी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून नाशिक लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मालेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश घुसर, पोलीस शिपाई, आत्माराम पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते राशीद सैय्यद यांचा नावांचा सहभाग आहे.
यामध्ये अमली पदार्थाच्या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीवर कारवाई होऊ नये यासाठी एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित व्यक्तीच्या भावाकडे आणि मित्राकडे एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, त्यात नंतर पन्नास हजार तरी द्या अशी मागणी होती.
नंतर यामध्ये तडजोड करून ही रक्कम 20 हजार रुपयांपर्यन्त आली होती. त्यावरून मालेगाव पोलीसांच्या ताब्यात असलेल्या व्यक्तीच्या भावाने आणि मित्राने एसीबीकडे तक्रार केली होती.
यामध्ये एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक सतीश भामरे यांनी तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.
लाचलुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षक गायत्री जाधव, हवालदार एकनाथ बाविस्कर, मनोज पाटील, पोलिस शिपाई संजय ठाकरे, नितीन नेटारे, संतोष गांगुर्डे यांनी ही कारवाई केली.