जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो, देवाची शपथ घेत असं खोटं आश्वासन देत दीड लाख रुपयांहून अधिक पैशांची फसवणूक करण्यात आल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार घडला. मात्र हा गंडा घालणं आरोपींना चांगलंच महागाताही पडलं. पैशांचा पाऊस न पडल्याने राग आल्याने एकाने गोळीबार केला, त्यामध्ये दोघे जण जखमीही झाले. त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आणि अथक तपास करत चौघा जणांच्या मुसक्या आवळल्या.
अवघ्या पाच तासांच्या आत पोलिसांनी याप्रकरणाचा छडा लावत चौघांना अटक केली. पैशांचा पाऊस पाडण्याचे आश्वासन देणाऱ्या दोघांविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला अशी माहिती धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
देवाची आण… पळासनेरच्या जंगलात पैशाचा पाऊस पाडतो
मिळालेल्या माहितीनुसार,सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला. शिरपूर येथील पळासनेर च्या जंगलामध्ये पैशाचा पाऊस पाडून देतो असं खोटं आश्वासन देण्यात आलं. दोन तरूणांनी मध्य प्रदेशातील चौघांना हे आश्वासन देत त्या बदल्यात दीड लाख रुपये देणार असा व्यवहार ठरला. मात्र जंगलात गेल्यावर पैशांचा पाऊस वगैरे काहीच न पडल्याने त्या चौघांनी त्यांचे दीड लाख रुपये परत मागितले.पण संबंधित व्यक्तींनी ते पैसे देण्यास नकार दिला. संपूर्ण रक्कम परत मिळत नसल्याचे पाहून त्या चौघांनाराग आला. पैशांचा पाऊस पडला नसल्याने आपली संपूर्ण रक्कम परत करावी ,असा हट्ट त्यांनी धरला. आणि त्याच वादादरम्यान त्यांच्यात झालेल्या झटापटीत बंदुकीतून दोन राऊंड फायर करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास करून मध्यप्रदेश येथून चौघा जणांच्या मुसक्या आवळल्या असून, यातील सांगवी येथील पैसे पाडून देण्याच अमिष दाखवणाऱ्या दोघां विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या संदर्भात धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती दिली.