नागपूर / 4 ऑगस्ट 2023 : तक्रार दिल्याचा राग मनात धरुन एकाने भरदिवसा किराणा दुकानदारावर गोळीबार केल्याची घटना नागपुरात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सन्नी शाहू असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीने गोळी झाडल्यानंतर नेम चुकल्याने दुकानदार थोडक्यात बचावला. राकेश हेमचंद शाहू असे दुकानदाराचे नाव आहे. नागपुरात दिवसाढवळ्या अशा गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत.
कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील भरतवाडा परिसरात हेमचंद्र शाहू यांचं तिरुपती किराणा नावाचं दुकान आहे. काही दिवसांपूर्वी दोन तरुण दुकानात आले. त्या दोघांनी बंदुकीची बुलेट दाखवून खंडणी मागितली. तसेच खंडणी न दिल्यास पुढल्या वेळी पिस्तलच घेऊ येऊ सांगितले. यानंतर दुकानदाराने कळमना पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. यामुळे आरोपी आणखी चिडले.
यानंतर आरोपी गुरुवारी दुपारी पुन्हा दुचाकीवरुन दुकानात आले. ‘किराणा दुकान चालवायचे असेल तर एक लाख रुपये खंडणी द्यावी लागेल’ अशी धमकी देत त्यांनी गोळीबार केला. मात्र गोळीचा नेम चुकला आणि गोळी दुकानाच्या छताला लागली. सुदैवाने शाहू हे थोडक्यात बचावले. गोळीचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत आल्याने आरोपी तेथून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. तपासादरम्यान आरोपी सनी पावनगावमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.