यवतमाळमध्ये भरदिवसा गोळीबार, तरुणाचा मृत्यू, हत्येमागील गूढ नेमकं काय?

| Updated on: Jul 26, 2021 | 12:21 AM

यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथे भरदिवसा एका तरुणावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

यवतमाळमध्ये भरदिवसा गोळीबार, तरुणाचा मृत्यू, हत्येमागील गूढ नेमकं काय?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथे भरदिवसा एका तरुणावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. पुसद-वाशिम रोडवर ही घटना घडली आहे. एका दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी इम्तियाज खान नामक 32 वर्षीय तरुणावर बंदुकीतुन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात एक गोळी तरुणाच्या डोक्यात लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

रुग्णालयात उपारासाठी नेल्यानंतर डॉक्टरांकडून मृत घोषित

गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तेथील स्थानिकांनी तातडीने तरुणाला उपचारासाठी स्थानिक मेडिकेआर रुग्णालयात दाखल केले. पण रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव इम्तियाज खान आहे. इम्तियाज हा मेकॅनिकल इंजिनिअर असून तो पुसद येथील अरुण ले आऊट येथे राहतो. मृतकाचा एसआरएसी मोटर वर्क अँड ऑटो नावाचं गॅरेज आहे.

पोलिसांचा तपास सुरु

गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. तरुणावर गोळीबार कुठल्या कारणासाठी झाला? याचा शोध पोलीस घेत आहे. पुसद येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी आता अधिक तपास करीत आहेत. मृतकावर आर्म ॲक्ट तसेच वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीतूनच मृतकावर गोळीबार तर झाला नाही ना ? याचा सुद्धा तपास पोलीस करत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वसंतनगर पोलिस करीत आहेत.

जळगावात उपमहापौरावर गोळीबार

दरम्यान, रविवारी (25 जुलै) जळगाव महापालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावरही गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे जळगावात प्रचंड खळबळ उडाली आहे. सदर गोळीबार हा त्यांच्या पिंप्राळा येथील घरावर झाला आहे. यात ते सुदैवाने बचावले आहेत. पोलीस याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासण्याची शक्यता आहे. गोळीबार करणारे नेमके कोण होते ते अद्याप समजू शकलेले नाही. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.

हेही वाचा : 

स्कॉर्पिओच्या ड्रायव्हर सीटखाली गावठी कट्टे, पोलीस समोर येताच पळापळ, मध्यप्रदेश ते राजस्थान व्हाया खान्देश पिस्तूल तस्करी?

अश्लील चित्रपटाच्या हिंदी स्क्रिप्ट मिळाल्या, तपासात अनेक खुलासे, राज कुंद्राच्या अडचणीत वाढ