बलिया : शाळेची फी भरली नाही म्हणून पहिलीच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे मुलगा आधी बेशुद्ध झाला आणि मग त्याला लकवा मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित कुटुंबाने मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक केली आहे. वर्गशिक्षक आणि शाळा व्यवस्थापक फरार आहेत. बलियातील रसरा कस्बे परिसरात एका खाजगी शाळेत ही घटना घडली. पीडित सात वर्षाच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपींविरोधात कलम 325 आणि 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली इयत्तेत शिकणाऱ्या मुलाची शाळेची फी भरली नव्हती म्हणून वर्गशिक्षिकेने त्याला 4 तास हात वर करुन उभे केले होते. शाळेतील अन्य शिक्षकांनी वर्गशिक्षिकेला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकायला तयार नव्हती.
शाळा व्यवस्थापक प्रद्युम्न वर्मा आणि मुख्याध्यापक सत्येंद्र पाल यांनीही वर्गशिक्षिकेला रोखले नाही. हात वर केल्याची शिक्षा दिल्यानंतर मुलाला काठीने मारहाणही करण्यात आली. यामुळे मुलगा बेशुद्ध झाला आणि त्याला लकवा मारला.
याप्रकरणी पीडित मुलाच्या नातेवाईकांनी वर्गशिक्षिका, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक केली आहे, तर वर्गशिक्षिका आणि शाळा व्यवस्थापक दोघे फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.