मुंबई, 17 जुलै 2023 : मुंबईच्या मार्वे बीचवर (Mumbai Marve Beach) फिरायला गेलेली 5 मुले समुद्रात (mumbai sea) पोहायला उतरली होती, त्याचवेळेस पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ती पाण्यात बुडाली. अग्निशमन दल, जीवरक्षक आणि पोलिसांच्या पथकाने काल दोन मुलांना तात्काळ बाहेर काढले, त्यामुळे दोघांचा जीव वाचला आहे. मात्र कालपासून 3 मुले बेपत्ता होती, त्यापैकी पोलिसांना (mumbai police) आज दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. अद्याप एका मुलाचा मृतदेह सापडला नसून अग्निशमन दल, जीवरक्षक आणि पोलिस त्या मुलाचा शोध घेत आहेत.
काल रविवारच्या सुट्टीच्या निमित्ताने मुंबईतील मालाड येथील मार्वे बीचवर 5 मुले आंघोळीसाठी गेली असताना अचानक वाढलेल्या पाण्यामुळे 5 मुले बुडाली. बुडालेल्या मुलांना वाचवण्यासाठी प्रथम बोटीची मदत घेण्यात आली, त्यानंतर तासनतास हेलिकॉप्टरद्वारे शोधमोहीम राबवण्यात आली. समुद्रात बुडालेल्या मुलांची शोधण्यासाठी काल दिवसभर तिन्ही दलाच्या पथकाने मोठी मेहनत घेतली. 5 पैकी 2 मुलांची जिवंत सुटका करण्यात आली आहे. दोन मृतदेह सापडले आहेत आणि एक बालक अद्याप बेपत्ता आहे, त्याचा शोध सुरू आहे. या सर्व मुलांचे वय 12 ते 16 वर्षे असून ते सर्व शालेय विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. ज्या मुलांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
विरारमध्ये आई-वडिलांच्या डोळ्यासमोर 11 वर्षीय मुलगा पापडखिंड तलावात बुडाला. ओम वसंत बोराडे (वय 11) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. काल रविवारचा दिवस असल्याने सर्वत्र गटारी साजरी केली जात होती. अनेकजण धबधबे, तलाव, रिसॉर्ट, शेततळे या ठिकाणी पाहायला मिळत होते. विरार पूर्व फुलपाडा परिसरातील पापडखिंड तलावात काल साडे पाच वाजता ही घटना घडली आहे.
आई, वडील, तीन मुलं आणि मुलांचे दोन मित्र असे 5 ते 6 जणांचा एक ग्रुप रविवारी विरार पूर्व फुलपाडा तलावाजवळ पिकनिकला गेले होते. तलावात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने यातील ओम, वंश आणि अंश हे तिन्ही मुलं हे अचानक पाण्यात बुडाली. वडिलांनी स्थानिकांच्या मदतीने दोन मुलांना बाहेर काढले. 11 वर्षाचा ओम याला बाहेर काढता आले नसल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.