गुजरात : डीआरआयने गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर (Mundra Port Gujrat) मोठी कारवाई केली आहे. परदेशी ब्रांडच्या सिगारेटचा मोठा साठा असलेला कंटेनर गुरुवारी डीआरआयने जप्त (Cigarettes Stock Seized) केला आहे. या कंटेनरमध्ये मॅन्चेस्टर ब्रँडच्या सिगारेटचे (Manchester brand cigarettes) 850 बॉक्स जप्त केले आहेत. या सिगारेटची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 17 कोटी रुपये आहे. सिगारेटबाबतची ही यंदाची चौथी मोठी कारवाई आहे. याप्रकरणी सीमा शुल्क अधिनियम अंतर्गत डीआरआयने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर गुरुवारी डीआरआयने मोठी छापेमारी केली. या छापेमारीत डीआरआयने 85,50,000 मॅन्चेस्टर ब्रँडच्या सिगारेट जप्त केल्या आहेत. यासंदर्भात आयातकर्ताची चौकशी सुरु आहे. तपासाअंतीच या सिगारेटची डिलिव्हरी कुणाकडे करण्यात येणार होती, हे उघड होईल.
डीआरआयने गेल्याच महिन्यात सप्टेंबरमध्ये मुंद्रा पोर्टवर कारवाई करत 18 कोटींची ई-सिगारेट जप्त केली होती. या सर्व सिगारेट कंटेनरमध्ये लपवण्यात आल्या होत्या. कंटेनरमध्ये मॉब, मालिशचे तेल, एलसीडी आणि काही बॉक्स ठेवण्यात आले होते. यामागे सिगारेटचे बॉक्स लपवण्यात आले होते.
छापेमारीत संपूर्ण कंटेनरमधील माल तपासला असता ई-सिगारेटचे 251 बॉक्स आढळून आले. यामध्ये 2 लाख ई-सिगारेट होत्या. या सर्व सिगारेट चीनमध्ये तयार करण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षभरात डीआरआयने एकूण 100 कोटींच्या सिगारेट जप्त केल्या आहेत.
सूरतजवळ 4 सप्टेंबर रोजी केलेल्या कारवाईत डीआरआयने 20 कोटींची ई-सिगारेट जप्त केली होती. एका ट्रकवर कारवाई करत ही सिगारेट जप्त करण्यात आली होती.