नवी दिल्ली : दिल्लीच्या (delhi) आनंद विहार टर्मिनसहून (anand vihar terminas) अगरतळ्याला जाणाऱ्या तेजस एक्सप्रेसमधून (tajas express) एक परदेशी महिला प्रवास करीत होती. त्यावेळी तिच्यासोबत छेडछाड केल्याचा आरोप प्रवास करणाऱ्या त्या महिलेने केला आहे. ती महिला ट्रेनची कोच नंबर H1 मधून प्रवास करीत होती. त्यावेळी तिच्यासोबत असा प्रकार घडल्याचं तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर कानपूर सेंट्रल स्टेशनवरती जीआरपीने आरपीएफच्या एका पोलिस शिपायाला ताब्यात घेतलं आहे.
संबंधित विदेशी महिला दिल्लीहून पटनाकडे निघाली होती. ताब्यात घेतलेल्या शिपायाची आरोग्य चाचणी केल्यानंतर त्याला कोर्टात सादर करण्यात येणार असल्याचे जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरपीएफच्या शिपायाची चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्या ट्रेनमध्ये असणाऱ्या इतर प्रवाशांची सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे. देशात आतापर्यंत अशा पद्धतीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षेची पुर्णपणे काळजी घेत असताना सुध्दा अशा पद्धतीने घटना घडत असल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. देशात अनेक अशा घटना उघडकीस आल्या आहेत. मागच्यावर्षी मध्यप्रदेशमध्ये सुध्दा अशा पद्धतीची एक घटना उघडकीस आली होती. त्यावेळी महिलेने विरोध केल्यानंतर त्या महिलेला ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आलं होतं.
महिलांना सुरक्षा पुरवणाऱ्या व्यक्तीकडून अशा प्रकारची कृत्य घडत असल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अशा पद्धतीच्या घटना घडत असल्यामुळे महिला एकट्या प्रवास करायला घाबरत आहेत. अशी कृत्य घडल्यानंतर धाडसी महिला तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येत असल्याची माहिती मिळाली आहे.