उत्तर प्रदेशातील मेरठमधील सौरभ हत्याकांडाचे पडसाद अद्यापही शमले नाहीत, मात्र तोपर्यंत आता झाशीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तेथे माजी मंत्र्यांच्या सुनेचा मृतदेह बेडरूममध्ये आढळून आला. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या खोलीत तिचा पती आणि प्रियकर दोघेही उपस्थित होते. महिलेने पती आणि तिच्या प्रियकरासोबत बेडरूममध्येच दारू पार्टी केली होती. यावेळी काही कारणावरून वाद झाला आणि त्याची परिणती महिलेची हत्या करण्यात झाली. भाडेकरूच्या माहितीवरून पोलीस आल्यावर त्यांनी कसाबास बेडरूमचा दरवाजा तोडला आणि ते आत शिरले. समोरचं दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. आत बेडवर एका महिलेचा मृतदेह पडला होता आणि तिचा प्रियकर तिच्या शेजारी झोपला होता. महिलेचा नवरा बाजूला सोफ्यावर झोपला होता. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. महिलेच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि शरीरावर जखमा आढळल्या.
नेमकं काय झालं ?
माजी मंत्री रतनलाल अहिरवार यांचा भाऊ तुलसीदास यांचा मुलगा रवींद्र अहिरवार हे पत्नी संगीता (36) आणि 3 मुलांसह कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मी गेट बाहेरील परिसरात राहतात. मोठी मुलगी एंजलने सांगितले की, रोहित वाल्मिकी गुरुवारी रात्री नऊ वाजता दारू घेऊन घरात आला होता. तिची आई संगीता, रोहित आणि वडील रवींद्र दारू पिऊन बेडरूममध्ये गेले. बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला. तिन्ही मुलांना वरच्या मजल्यावर भाडेकरू महिलेकडे पाठवले. आत या तिघांची मद्यपानाची पार्टी बराच वेळ चालू होती.
मुलीने दरवाजा ठोठावला पण..
मुलीने सांगितलं की सुमारे एक तासानंतर ते खाली आले आणि दुसऱया खोलीत गेले. तेवढ्यात बेडरूममधून भांडणाचा आवाज येऊ लागला. आई जोरात ओरडत होती. ते ऐकून मुलगी बेडरुमकडे पळत सुटली, तिने दार ठोठावले. रोहितने दार थोडं उघडलं. त्याने मुलीला 100 रुपये दिले आणि बाहेर जाऊन काहीतरी घेऊन ये असे सांगितले. त्यानंतर रोहितने दरवाजा बंद केला. त्यानंतर त्याने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलीने घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या शकुंतला या भाडेकरूकडे धाव घेतली आणि तिला घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं.
पण तोपर्यंत खोलीतील आवाज शांत झाला होता. मात्र तरीही शकुंतलाने दार ठोठावून ते उघडण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच दरवाजा उघडला नाही. ते पाहून शकुंतलाने 112 नंबर डायल करून पोलिसांना फोन केला. पोलिस आले असता बेडरूमला आतून लॉक होतं. पोलीसांनी जबरदस्तीने धक्का देत दरवाजा तोडला आणि ते आत पोहोचले तेव्हा त्या महिलेचा प्रियकर तिच्या मृतदेहाशेजारी पडलेला होता. नवरा समोर सोफ्यावर झोपला होता. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आणि त्यांना पोलीस ठाण्यात आणले.
त्या खोलीतून दारूच्या तीन बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. संगीताला मुलगी एंजल ( वय 12), 10 वर्षांची मुलगी अर्पिता आणि 5 वर्षांचा मुलगा अंश अशी तीन मुलं आहेत. संगीता अहिरवार यांचा मृतदेह त्यांच्या बेडरूममध्ये आढळून आला. महिलेचा पती आणि प्रियकरही एकाच खोलीत आढळून आले. दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती एसपी सिटी ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी दिली. त्या महिलेच्या डोळ्यावर आणि गळ्यावर जखमेच्या खुणा होत्या. तिचा मृत्यू कसा झाला हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावरच स्पष्ट होईल.