सांगली / शंकर देवकुळे : जतचे भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ताड यांच्या हत्येप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी चार जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी फरार आहे. संदीप चव्हाण, निकेश मदने, आकाश व्हंनखंडे, किरण चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. भाजपचा माजी नगरसेवक उमेश सावंत हा या हत्याकांडाचे मुख्य सूत्रधार असून, तो फरार आहे. उमेश सावंत याच्या सांगण्यावरून ही हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगली जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पोलीस फरार आरोपी उमेश सावंतचा शोध घेत आहेत.
भाजपचा माजी नगरसेवक उमेश सावंत हाच या खुनाचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. मात्र खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सावंत याने ताड यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून घडवून आणली, याबाबत पोलीस तपास अधिक करत आहेत. ताड यांच्या खून प्रकरणातील चौघा आरोपींना कर्नाटकच्या गोकाक येथून अटक करण्यात आली आहे. तर फरार मुख्य सूत्रधार माजी नगरसेवक उमेश सावंत याच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आली आहेत. लवकरच सावंत याला अटक केली जाईल, असे सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांची सांगितले.
सांगलीच्या जत या ठिकाणी 17 मार्च रोजी भरदिवसा भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून आणि डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. विजय ताड हे दुपारच्या सुमारास आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले असता सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूलजवळ हल्लेखोरांनी गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला चढवला होता.
या घटनेने संपूर्ण जिल्हयात खळबळ उडाली होती. ही घटना कोणी केली आणि कोणत्या कारणातून केली, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. याप्रकरणी सांगली पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन गतीने तपास सुरू केला होता. यासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली होती. अखेर या प्रकरणी पाच जणांची नावे निष्पन्न झाली असून, यामध्ये मुख्य सूत्रधार हा भाजपच्या माजी नगरसेवक उमेश सावंत असल्याचं धक्कादायक माहिती समोर आली.