उल्हासनगर / निनाद करमरकर : उल्हासनगरात एकाच रात्रीत लुटमारीच्या उद्देशाने चौघांवर प्राणघातक हल्ले करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रिक्षातून लुटमारीसाठी फिरणारे हे हल्लेखोर एकच होते. त्यापैकी दोघांना विठ्ठलवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नागरिकांवर चॉपरने हल्ला करत आरोपींनी त्यांच्याकडील मोबाईल आणि पैसे काढून घेतले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. दोन आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा तपास करत आहेत.
उल्हासनगरात बुधवारी रिक्षेतून फिरणाऱ्या या लुटारूंनी धुमाकूळ घातला. या लुटारूंनी कॅम्प 4 परिसरात तीन जणांवर चॉपरने हल्ला चढवत त्यांच्याकडून पैसे आणि मोबाईल काढून घेतले. त्यानंतर कॅम्प 1 परिसरात एकावर हल्ला करत त्याच्याकडूनही मोबाईल आणि पैसे लुटण्यात आले. या हल्ल्यात चौघेही जखमी झाले आहेत.
रवी निर्भवणे, विद्यानंद पांडे आणि रोहित पंडित अशी जखमी तिघांची नावं असून, एकाचे नाव कळू शकले नाही. या सर्वांना उपचारांसाठी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलंय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत दोन लुटारूंना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या इतर साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
दरम्यान, भररस्त्यात घडलेल्या या हल्ल्याच्या घटनांनळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस पावलं उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नवी मुंबई परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. त्यात अनुषंगाने खारघर पोलिसांनी तपास करत सोनसाखळी चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये तब्बल 4 लाख 47 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.