होळीच्या आधीच बेरंग, मोबाईलमुळे क्षणात कुटुंब उद्ध्वस्त.. तुम्ही ही चूक कधीच करू नका !

| Updated on: Mar 25, 2024 | 10:38 AM

सध्या देशभरात होळीची, रंगाची धूमधाम सुरू आहे. मात्र होळीपूर्वी उत्तर प्रदेशात एका घरात एक वेदनादायक दुर्घटना घडली. होळीच्या रंगांचा आनंद लुटण्यापूर्वीच एका घरात रंगाचा बेरंग झाला. मोबाईलमुळे झालेल्या दुर्दैवी घटनेत एकाच घरातील , कुटुंबातील 6 जण गंभीर जखमी झाले.

होळीच्या आधीच बेरंग, मोबाईलमुळे क्षणात कुटुंब उद्ध्वस्त.. तुम्ही ही चूक कधीच करू नका !
मोबाईलच्या स्फोटामुळे खोलीत आग लागली आणि घर उद्ध्वस्त झालं. (प्रातिनिधिक फोटो)
Follow us on

सध्या देशभरात होळीची, रंगाची धूमधाम सुरू आहे. मात्र होळीपूर्वी उत्तर प्रदेशात एका घरात एक वेदनादायक दुर्घटना घडली. होळीच्या रंगांचा आनंद लुटण्यापूर्वीच एका घरात रंगाचा बेरंग झाला. मोबाईलमुळे झालेल्या दुर्दैवी घटनेत एकाच घरातील , कुटुंबातील 6 जण गंभीर जखमी झाले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला असून ती चौघंही लहान मुलं आहेत. तर त्यांच्या पालकांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. पल्लवपुरम पोलीस स्टेशन हद्दीतील जनता कॉलनीत शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. अख्खं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं.

मिळालेल्या माहितीनुसार, खोलीत इलेक्ट्रिकल बोर्ड होता आणि मोबाईल चार्जिंगला लावला होता. अचानक शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या बाहेर पडल्या आणि त्याच ठिणगीमुळे बेडवरील फोमच्या गादीला आग लागली. आणि संपूर्ण खोलीत आग पसरली. आग लागल्याचे समजताच पती-पत्नीने त्यांच्या मुलांना घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्यासाठी ते आटापिटा करत होते. मात्र भीषण आगीत संपूर्ण कुटुंब होरपळलं. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत त्या कुटुंबाला बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत सहा जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथून त्यांना मेरठच्या लाला लजपत राय मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आलं.

मुजफ्फरनगरमधील कुटंब

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंब हे मुजफ्फरनगरमधील आहे. जॉनी हा त्याच्या कुटुंबासह जनता कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होता, तो रोजंदारीवर काम करतो. होळीमुळे शनिवारी ते घरीच होते आणि त्यांची पत्नी बबिता स्वयंपाक करत होती. खोलीत त्यांची चारही लहान मुलं ( वय 10, 8, 6 आणि 5) उपस्थित होती. मोबाईलच्या स्फोटामुळे आग लागून जॉनी, त्याची पत्नी आणि मुलं गंभीर जखमी झाली. उपचारांदरम्यान त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. तर सकाळ होईपर्यंत उर्वरित दोन मुलांनीही अखेरचा श्वास घेतला. तर जॉनी आणि त्याच्या पत्नीची तब्येत अजूनही नाजूक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मोबाईलमुळे लागली आग

जॉनीच्या घरात मोबाईल चार्जिंगला लावला होता, अचानक त्याचा स्फोट झाला आणि आग लागून संपूर्ण कुटुंब होरपळलं, असं जॉनीच्या नातेवाईकांनी सांगितलं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

कधीच करू नका ही चूक

स्मार्टफोन युजर्स अनेकदा काही कॉमन चुका करतात, ज्यामुळे मोबाईलचा स्फोट होतो. त्यामुळे घराला आग लागू शकते. अशा घटना घडू नयेत म्हणू या चुका करणे टाळावे.

ओरिजनल चार्जर वापरा – दुसऱ्या कंपनीचा चार्जर वापरल्याने स्मार्टफोनला आग लागण्याच्या, ब्लास्ट होण्याच्या घटना जास्त घडतात. अनेकदा हाय पॉवर चार्जेसमुळे मोबाईलची बॅटरी वेगाने गरम होते, त्यामुळे तिचा स्फोट होतो. त्यामुळे मूळ चार्जरच वापरावा.

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये लोकल बॅटरी वगैरे वापरत असाल तर त्याचा स्फोट होण्याची दाट शक्यता असते. बरेचदा लोक स्वस्त मिळते म्हणून लोकल बॅटरी वापरतात , पण तसं करणं घातक ठरू शकतं.