जोधपूर : नाशिक, मुंबई, सांगलीतील आगीच्या घटना ताज्या असतानाच आता राजस्थामधील जोधपूरमध्ये आगीची घटना उघडकीस आली आहे. गॅस लिकेज चेक करण्यासाठी एका व्यक्तीने माचिस पेटवला आणि धडाधड चार सिलेंडरने पेट घेतला. गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे (Gas Cylinder Blast) घरात आगीचा एकच भडका उडाला आणि यात घरातील चार सदस्यांचा होरपळून मृत्यू (Four People Burn Alive) झाला आहे. तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. जोधपूरमधील कीर्ती नगरमधील (Jodhpur Kirti colony) रिहायशी कॉलनीतील एका घरामध्ये ही घटना घडली आहे.
मृतांमध्ये दुर्घटनाग्रस्त घरमालकाच्या दोन मुली, एक मुलगा आणि मेव्हण्याचा समावेश आहे. अन्य गंभीर जखमी झालेल्या 16 जणांना उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये अधिक जण 80 टक्क्यांहून अधिक भाजले आहेत.
ज्या घरामध्ये स्फोट झाला त्या घरामध्ये बेकायदेशीररित्या सिलेंडरचा व्यवसाय सुरु होता. एका सिलेंडरमधून गॅस लिकेज होत असल्याचे तेथील लोकांच्या लक्षात आले. गॅस लिकेज चेक करण्यासाठी एकाने माचिस पेटवला आणि सिलेंडरने पेट घेतला. यानंतर एकापाठोपाठ एक 4 सिलेंडरचा स्फोट झाला.
हा स्फोट इतका भयानक होता की, बाहेर उभे असलेले काही लोकांपर्यंत आगीच्या झळा पोहचून ते जखमी झाले. सर्व जखमींना तात्काळ आधी नयापुरा रुग्णालयात आणि नंतर महात्मा गांधी रुग्णालयात हलवण्यात आले.
घटना घडली तेव्हा सदर घराबाहेर गॅस एजन्सीची गाडी उभी होती. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग इतकी भयानक होती की, घराबाहेर उभी असलेली वाहनेही जळाली आहेत. स्फोटात घरातील सर्व सामान जळून खाक झाले आहे.