कल्याण / 24 जुलै 2023 : कल्याण-डोंबिवलीत सोनसाखळी चोराची दहशत थांबायचं नाव घेत नाही. एका आठवड्यात भररस्त्यात महिलांना लुटण्याच्या चार घटना उघडकीस आल्या आहेत. महिलांशी झटापटी करत त्याच्याजवळील सोन्याचे दागिने खेचून नेले. या घटनेत भररस्त्यात झालेल्या झटापटीदरम्यान दोन गृहिणी जखमी झाल्या आहेत. या चारही घटनांमध्ये लुटारूंनी 2 लाख 38 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. या चारही घटनांपैकी अद्याप एकही आरोपी हाती लागला नसल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे कल्याण पश्चिमेत ज्या 2 घटना घडल्या, त्या ठिकाणी डीसीपी कार्यालय, एसीपी कार्यालय आणि महात्मा फुले पोलीस चौकीचा वेढा आहे. चोर खुलेआमपणे महिलेशी झटापटी करत सोनसाखळी चोरत असल्याने पोलीस सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे.
डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडला असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ राहणाऱ्या पुष्पा विजय जोशी या 74 वर्षीय महिलेच्या बाबतीत घडली. बुधवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास पुष्पा या संगीता वाडीतील डोंबिवली पूर्वजवळ असलेल्या शिवमंदिरात दिवा-बत्ती करून जात होत्या. यावेळी दोघांनी त्यांना वाटेत अडवले.
सध्या अधिक महिना चालू असून धान्य आणि तेल वाटप सुरू आहे, असे बोलून पुष्पा यांच्या हातातील 25 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या पिशवीत ठेवण्यास सांगितल्या. सदर पिशवीस गाठ मारून त्या इसमांनी पुष्पा यांना बोलण्यात गुंतवले आणि नकळतपणे पिशवीतील बांगड्या चोरून शिवमंदीरच्या दिशेने पलायन केले. पुष्पा यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा रोडला असलेल्या काटेमानिवली येथील रहिवासी श्वेता ओमप्रकाश मिश्रा ही गृहिणी शनिवारी संध्याकाळी 6.57 च्या सुमारास भाजी खरेदी करून 60 फुटी रोडने चालत घरी जात होती. घराजवळ येताच अचानक पाठीमागून स्कूटरवरून आलेल्या दोघांनी गृहिणीच्या गळ्यातील 2.5 तोळे वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून जमिनीवर पाडले. यात गृहिणीच्या हाता-पायाला मुक्का मार बसला. त्यानंतर लुटारूंनी स्कूटरवरून पळ काढला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेकडील इंदिरा नगरमध्ये असलेल्या बौद्ध विहारजवळ शनिवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. बिर्ला कॉलेजच्या दत्तात्रय कॉलनीतील आपुलकी सोसायटीत राहणाऱ्या विद्युल्लता उमेश खिलारी या इंदिरा नगरमधील उषा ब्युटीक लेडीज टेलरकडे दिलेले कपडे घेण्यासाठी जात होत्या. यावेळी पाठीमागून स्कूटीवरून आलेल्या दोघांनी मागे बसलेल्या इसमाने विद्युल्लता यांच्या गळ्यावर जोरात थाप मारून 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळ काढला. या झटापटीत विद्युल्लता यांच्या मानेला खरचटून जखम झाली. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या महिलांनी सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना कल्याण पश्चिमेकडील स्टेशन रोडला घडली. नारायण वाडीतील एम. एम. शंखलेशा ज्वेलर्स दुकानात रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. दुकानाच्या मालकीण विमल सुमेरमल शंखलेशा यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दुकान आणि आसपासच्या परिसरात लावलेल्या सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे चोरट्या महिलांचा शोध सुरू केला आहे.