अहमदनगर / मनोज गाडेकर : नदीवर अंघोळीसाठी गेलेले चार मित्र बुडाल्याची दुर्दैवी घटना नगरमधील नेवासा तालुक्यात घडली आहे. दोघांचे मृतदेह सापडला असून, अन्य दोघांचा शोध सुरु आहे. तर एक जण सुखरुप बचावला आहे. नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने तिघांचा शोध सुरू आहे. नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम कायगाव येथे शनिवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली.
बाबासाहेब अशोक गोरे, नागेश दिलीप गोरे, आकाश भागिनाथ गोरे आणि शंकर पारसनाथ घोडके अशी बुडालेल्या चौघांची नावे आहेत. शंकर घोडके आणि अन्य एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. अन्य दोघांचे मृतदेह शोधण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. हे सर्व चौघेही वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील रहिवासी आहेत.
वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील पाचजण मोटरसायकलवर मढी येथे यात्रेसाठी चाललेले होते. जाताना हे सर्वजण प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर महादेव मंदिराजवळ अंघोळीसाठी थांबले होते. गोदावरी नदीतील खडड्यांचा अंदाज न आल्याने चारजण पाण्यात बुडाले असून, एकाचे प्राण वाचले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक मदतीसाठी धावून आले. पोलीसही घटनास्थळी पोहचले असून, दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. तर दोघांचा अजूनही शोध सुरू आहे.