नागपूर / सुनील ढगे (प्रतिनिधी) : मुलीला वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश मिळवून देतो सांगत एका व्यक्तीला तब्बल 52 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. तामिळनाडूच्या ठगबाजानी नागपूरच्या पालकाला हा गंडा घातला आहे. या प्रकरणी तामिळनाडूच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमप्रकाश वंदेवार असे फसवणूक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित व्यक्तीने मानकापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींना पकडण्यासाठी पुढील कारवाई करत आहेत.
झिंगाबाई टाकळी परिसरात राहणारे ओमप्रकाश वंदेवार हे सलुनचा व्यवसाय करतात. त्यांच्या मुलीने नीटची परीक्षा पास केली, मात्र मार्क कमी असल्याने तिला सरकारी कोट्यात प्रवेश मिळाला नाही.
यामुळे मुलीच्या प्रवेशासाठी वंदेवार खाजगी महाविद्यालयात प्रयत्न करत होते. याच दरम्यान वंदेवार यांना मेडिकल प्रवेशाचे काम करणाऱ्या तामिनाडूच्या एका व्यक्तीचा नंबर मिळाला.
या व्यक्तीने त्यांना तामिळनाडूच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये मुलीला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच आमिष दिलं. त्यासाठी ओमप्रकाश यांच्याकडून तामिळनाडूच्या तिघांनी तब्बल 52 लाख रुपये घेतले.
मात्र पैसे देऊनही प्रवेशही मिळाला नाही, यामुळे अखेर नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार दिली. यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या तिघांवर गुन्हे दाखल केले असले तरी आरोपींचा शोध घेऊन पैसे परत मिळणार का ? हा प्रश्न आहे.