प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञाच्या नावे दुसऱ्या डॉक्टरची फसवणूक, काय आहे प्रकरण?

| Updated on: May 27, 2023 | 1:26 PM

एका महिला डॉक्टरला प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञाच्या नावे व्हॉट्सअपवर मॅसेज आला. यानंतर मॅसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे फेडरेशनच्या पदासाठी महिलेने सर्व प्रक्रिया पार पाडली. पण जेव्हा सदर डॉक्टरशी तिचे बोलणे झाले तेव्हा ती हैराणच झाली.

प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञाच्या नावे दुसऱ्या डॉक्टरची फसवणूक, काय आहे प्रकरण?
प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञाच्या नावे महिला डॉक्टरची फसवणूक
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ महिला डॉक्टरच्या नावाखाली दुसऱ्या महिला डॉक्टरची फसवणूक केल्याची घटना मुंबईतील खार परिसरात उघडकीस आली आहे. दोघीही डॉक्टर स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. खार येथील 18 व्या रोडवरील बीम्स हॉस्पिटलमधील डॉ. मंजिरी कवाडे यांना प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ नंदिता पालशेतकर यांनी पाठवलेला एक व्हॉट्सअॅप मेसेज आला. या मॅसेजमध्ये डॉ. कवाडे यांना फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या सरचिटणीसपदाची ऑफर देण्यात आली होती. याप्रकरणी भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

पदाचे आश्वासन देत नोंदणी शुल्क भरण्यास सांगितले

डॉ. कवाडे यांना निवडणुकीशिवाय प्रतिष्ठेचे पद मिळेल आणि वर्षाला तीन लाख रुपये मिळतील, असे सांगण्यात आले. फसवणूक करणार्‍याने त्यांना एक फॉर्म भरण्यास आणि GPay द्वारे नोंदणी शुल्कासाठी 30,450 रुपये भरण्यास सांगितले. यानंतर डॉ. कवाडे यांना अनेक कागदपत्रे पाठवण्यासही सांगण्यात आले. डॉ. कवाडे यांनी आरोपीने सांगितल्याप्रमाणे सर्व प्रोसेस केली.

‘असा’ उघड झाला गुन्हा

डॉ. पालशेतकर त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या वडिलांचे निधन झाल्याने परदेशात गेल्याचे दुसऱ्या व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे कवाडे यांना सांगण्यात आले. यामुळे कवाडे यांचा संशय बळावला. त्यानंतर त्यांना तीस हजार रुपये पाठवण्यास सांगण्यात आले. त्यानंतर डॉ. कवाडे यांनी डॉ. पालशेतकर यांच्याशी संपर्क केला. यानंतर आपण सायबर फसवणुकीला बळी पडल्याचे कवाडे यांच्या लक्षात आले.

हे सुद्धा वाचा

डॉ. पालशेतकर यांनी कोणताही व्हॉट्सअॅप मॅसेज पाठवल्याचा इन्कार केला. याबाबत डॉ. कवाडे यांना विचारणा करण्यात आली. फेडरेशनमधील पद केवळ निवडणुकीद्वारे मिळू शकते हे माहीत असताना त्यांनी पैसे का दिले? व्हॉट्सअप मॅसेज खरा असल्याचे वाटल्याने आपण पैसे पाठवल्याचे डॉ. कवाडे यांनी सांगितले.

तसेच डॉ. पालशेतकर या अत्यंत नामांकित डॉक्टर आहेत आणि त्यांच्याकडून आलेल्या मॅसेजकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यावेळी इतर सर्व गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या नव्हत्या, असे डॉ कवाडे यांनी स्पष्ट केले. मॅसेज पाठवणाऱ्याच्या आयडीवरील डिस्प्ले चित्र देखील डॉ. पालशेतकरांचे होते. यानंतर डॉ. पालशेतकर यांनी डॉ. कवाडे यांना पोलीस तक्रार देण्यास सांगितले.