अभिजीत पोते, पुणे : ऑनलाईन टास्कच्या नावाने फसवणुकीचे प्रकार सध्या पुणे शहरात वाढले आहेत. आयटी हब म्हणून ओळख असलेल्या पुण्यात अभियंत्यांना टार्गेट केले जात आहे. अशीच एक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. झटपट पैसे कमावण्यासाठी ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याचे आमिष दाखवत अभियंता महिलेला लाखोंचा गंडा घातल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. ज्यादा परतावा आणि टास्क पूर्ण करण्यास सांगून पुण्यात अभियंता महिलेची 38 लाखांची फसवणूक केली आहे. अभियंता महिलेने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यानुसार टेलीग्राम ॲपवर लिंक पाठविणारे तसेच बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडगाव शेरी येथे 4 ते 6 एप्रिल दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला. फिर्यादी महिला ही आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. महिलेला टेलिग्रामवरील फसव्या वेब पेजच्या माध्यमातून ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास आकर्षक पैसे कमावण्याचा विश्वास आरोपींनी दाखवला. यातूनच आरोपींनी फिर्यादीकडून वेळोवेळी अनेक खात्यांवर पैसे ट्रान्स्फर करायला लावले. महिलेला कोणताही परतावा न देता तसेच गुंतवलेली रक्कम परत न करता महिलेची 38 लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली.
टेलिग्रामवर नवीन मेंबरने एखादा ग्रुप जॉईन केल्यास या ग्रुपवर नवीन मेंबरला एखादा टास्क पूर्ण करण्यास लिंक टाकण्यात येत असे. या लिंकवर क्लिक करुन टास्क पूर्ण केल्यास पैसे कमावण्याची ऑफर दिली जात असे. पैसे कमावण्याची हव्यासापोटी तो व्यक्ती या जाळ्यात फसायचा. मग ते टास्क पूर्ण करत करता पैसे भरण्यास सांगितले जायचे. जाळ्यात फसलेला तो व्यक्ती पैसे भरायचा. मग भरलेले पैसे आणि अधिकचे पैसेही परत मिळायचे नाहीत.