डोंबिवली : सायबर गुन्हेगार फसवणुकीचे नवनवीन फंडे अवलंबत असतात. फसवणुकीसाठी गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. हल्ली जॉब ऑफर करत फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. अशीच एक फसवणुकीची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. पार्ट टाईम जॉबची ऑफर देत एका व्यावसायिकाला साडे चार लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. मंदार मोरेश्वर जाधव असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी व्यावसायिकाच्या फिर्यादीवरुन विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
डोंबिवलीत राहणाऱ्या मंदार जाधव या 38 वर्षीय व्यावसायिकाच्या मोबाईलवर एक मॅसेज आला. या मॅसेजमध्ये पार्टटाईम जॉबची ऑफर देण्यात आली होती. मॅसेजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवरील पोस्ट लाईक आणि सबस्क्राईब केल्यास प्रतिदिन 2000 ते 5000 रूपये मिळतील, असे सांगण्यात आले होते. यानंतर टेलिग्रामवर एक ग्रुप बनवून त्याचा फिर्यादीला फायदा मिळवून दिला.
यानंतर ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यास सांगितले. या टास्कच्या नावाखाली विविध बँक खात्यावर एकूण 4,78,000 रूपये भरण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी मंदार जाधव याने विष्णुनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली. या प्रकरणी डोंबिवलीत विष्णुनगर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात कलम 66 (क) (ड) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक खंदारे करत आहेत.
हल्ली अशा प्रकारे मॅसेज पाठवून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशा मॅसेजपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.