कल्याण / सुनील जाधव : कल्याणमधील न्यू इंडिया एन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करुन विमा कंपनीची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल 19 जणांनी विमा कंपनीची 14 लाख 64 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार कंपनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महात्मा फुले पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत. कल्याण-मुरबाड रोडवरील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात हा प्रकार घडला आहे.
सन 2018 ते 2019 या कालावधीत न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या मुरबाड रस्त्यावरील गुरुगोविंद निवास संकुलातील कार्यालयात हा प्रकार घडला आहे. या फसवणूक प्रकरणी न्यू इंडिया एश्युरन्स कंपनीचे व्यवस्थापक सतिश संभाजी भगत यांनी 19 फसवणूकदारांविरुध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
या 19 जणांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना विमा दाव्यासंदर्भात खोटी माहिती दिली. अधिकाऱ्यांची दिशाभूल करुन 14 लाख 69 हजार 719 रुपयांचे विमा दावे मंजूर करुन घेतले. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास आणला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, एपीआय दीपक सरोदे यांची टीम अधिक तपास करत आहेत.