वसई / 30 ऑगस्ट 2023 : गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांना अधिक काळ फसवू शकत नाही. अखेर तो पकडला जातोच. अशीच एक घटना वसईत घडली आहे. आठ वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला बेड्या ठोकण्यास पोलिसांनी यश आले आहे. गुन्हेगाराच्या हातावरील टॅटूवरुन पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि अखेर त्याला बेड्या ठोकल्या. शिवबाबू उर्फ शिवा भैय्या जगतपाल निषाद असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. वसई क्राईम ब्रँच युनिट 3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक शाहूराज रणविरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे यांच्यासह सर्व टीमने ही कामगिपृरी केली.
आरोपी शिवाभय्या आणि त्याच्या इतर साथीदारांनी 17 मार्च 2016 रोजी नालासोपारा पूर्व वलईपाडा परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून सुभाषचंद्र उर्फ भालू रामाशंकर गुप्ता या 21 वर्षीय तरुणाची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरून अज्ञात ठिकाणी फेकून सर्व आरोपी फरार झाले होते. याबाबत तुळिंज पोलीस ठाण्यात भादवी 302, 404, 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील विविध गंभीर गुन्ह्यातील पाहिजे, फरार आणि निष्पन्न आरोपींचा शोध घेऊन, त्यांना अटक करण्याच्या सूचना सर्व क्राईम ब्रँच आणि पोलीस ठाण्याला मिळाल्या होत्या. त्यानुसार हा गुन्हा निकाली काढण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशावरून वसई क्राईम ब्रँच टीम 03 च्या पथकाने आरोपीचा शोध सुरु केला. पोलिसांना आरोपीचा एक अस्पष्ट फोटो मिळाला. या फोटोत आरोपीच्या हातावर टॅटू असल्याचे दिसले. या टॅटूवरुन पोलिसांनी आरोपीचा छडा लावला.
आरोपी उत्तर प्रदेशातील आपल्या गावी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यातील तीन आरोपींना आधीच अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी फरार होता. आठ वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र अखेर पोलिसांनी त्याला पकडलेच.