गडचिरोली / 4 ऑगस्ट 2023 : एका 19 तरुणीची रात्री झोपेत कुणीतरी हत्या केली. या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यत एकच खळबळ उडाली. गेले 20 दिवस या हत्याकांडाचा पोलीस कसून तपास करत होते. मात्र पोलिसांना काहीच सुगावा लागत नव्हता. हत्येप्रकरणी सुमारे 80 संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी केली, मात्र तरीही पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते. चौकशीदरम्यान एका महिलेने एक गोष्ट सांगितली आणि अखेर हत्येचे रहस्य उलगडण्यास यश आले. यानंतर जे उघड झालं त्याने घरच्यांसह पोलीसही हैराण झाले. मामेभावानेच आत्येबहिणीची हत्या केली होती. हत्या करण्याचे कारणही सर्वांना थक्क करणारे होते. आपल्या पत्नीची आणि बहिणीची मैत्री पसंत नसल्याने भावानेच बहिणीचा काटा काढला. याप्रकरणी आरोपी भावाला अटक केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम रंगय्यापल्ली गावात 13 जुलै रोजी 19 वर्षीय तरुणीची निर्दयी हत्या झाली. सकाळी हत्येचा उलगडा होताच गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सिरोंचा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा तपास सुरु केला. मात्र 20 दिवस पोलीस या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी जंग जंग पछाडले. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते. पोलिसांनी 80 संशयितांची चौकशी केली. पण म्हणतात ना गुन्हा फार काळ लपून राहत नाही.
चौकशीदरम्यान एका महिलेने पोलिसांना मयत तरुणी आणि तिच्या मामेभावाच्या भांडणाबाबत सांगितले. यानंतर पोलिसांनी मामेभावाला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर मुख्य आरोपी मामेभावाला पोलिसांनी अटक केली आहे. मयत तरुणीचे घर आणि मामाचे जवळ जवळ होते. त्यामुळे तरुणीचे मामाच्या घरी वरचेवर येणे-जाणे सुरु होते. तरुणीची मामेभावाच्या बायकोशी चांगली गट्टी होती. दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. तसेच दोघी सारख्या फोनवर बोलत असायच्या.
आरोपीला आपल्या पत्नीची तरुणीशी मैत्री खटकत होती. त्याने दोन-तीन वेळा तरुणीला पत्नीपासून दूर राहण्यास सांगितले. मात्र तरुणी ऐकत नव्हती. यामुळे आरोपीला तिच्यावर राग होता. घटनेच्या दिवशीही आरोपी आणि मयत तरुणीमध्ये वाद झाला होता. यानंतर रात्री झोपेत असताना आरोपीने तरुणीचा काटा काढला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. स्वामी आत्राम असे अटक आरोपीचे नाव आहे.