गडचिरोली | 19 ऑक्टोबर 2023 : आधी पती- पत्नी, नंतर विवाहित मुलगी, त्यानंतर मावशी व नंतर मुलगा अशा पध्दतीने २० दिवसांत लागोपाठ कुटुंबातील पाच जणांच्या (death of 5 people) रहस्यमय मृत्यूने गाव हादरलं. अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे ही खळबळजनक घटना घडल्याने सगळेच चक्रावले होते. अखेर या सर्वांच्या मृत्यूचा उलगडा झाला असून गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. अतिशय थंड डोक्याने, कट आखून या हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र खुनातील गुन्हेगारांची नावं समोर आल्यानंतर सगळेच हादरले.
घरातील सून आणि मामीनेच हे दुष्कृत्य केले. सासरच्या छळाला कंटाळल्यामुळे सुनेने आणि संपत्तीच्या वादातून मामीने मिळून हे भयानक पाऊल उचलले. संगनमताने हे खून करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. अन्नपाण्यात विष मिसळून या पाचही जणांना संपवण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी सून संघमित्रा आणि मृत रोशनची मामी रोजा रामटेके या दोघींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
शंकर तिरुजी कुंभारे (५२), विजया शंकर कुंभारे, त्यांची विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी), मावशी आनंदा उराडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर), मुलगा रोशन शंकर कुंभारे (२८) अशी मृतांची नावं आहेत. शंकर कुंभारे यांचे महागाव येथे टिंबर मार्टचे दुकान आहे. याप्रकरणी सून संघमित्रा रोशन कुंभारे (२५) व रोशनची मामी रोजा रामटेके (५२) या दोघींना बेड्या ठोकण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे.
५ जणांच्या मृत्यूने हादरलं गाव
२२ सप्टेंबर रोजी रात्री जेवल्यानंतर विजया शंकर कुंभारे यांची तब्येत बिघडली. त्यांना तीव्र डोकेदुखी व उलट्या होऊ लागल्याने पती शंकर तिरूजी कुंभारे यांनी त्यांना चंद्रपूरला नेले. मात्र त्यानंतर शंकर कुंभारे यांचीही प्रकृती खालावली. दोघांनाही उपचारांसाठी नागपूरला हलवण्यात आले. मात्र २६ सप्टेंबर रोजी शंकर यांचा तर २७ सप्टेंबरला विजया यांचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा कुंभारे यांची विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी) माहेरी आली होती. अचानक तिचीही प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र तब्येत खालावल्याने चंद्रपूरला नेताना ८ ऑक्टोबर रोजी तिचाही मृत्यू झाला.
तर शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा रोशन कुंभारे (२८) याचा १५ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अंत्यविधीसाठी महागावला आलेली रोशनची मावशी आनंदा उंदीरवाडे (५०, रा. बेझगाव ) यांची प्राणज्योत १४ ऑक्टोबरला मालवली. चंद्रपूर येथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
एकाच कुटुंबातील पाच जणांचा लागोपाठ मृत्यू झाल्यानंतर अहेरी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. घातपातमुळेच हे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी तपास सुरू केला.
सुनेने आणि मामीने थंड डोक्याने आखला हत्येचा कट
मिळालेल्या माहितीनुसार, मृत रोशन याची पत्नी व कुंभारे कुटुंबाची सून असलेली संघमित्रा ही मूळची अकोला येथील आहे. ती बीएस्सी ॲग्री सेकंड टॉपर आहे. ती व रोशन हे दोघे पोस्ट खात्यात एकत्र काम करायचे. तेथेच त्यांचे एकमेकांवर प्रेम जडलं. डिसेंबर २०२२ मध्ये त्या दोघांनी विवाह केला. ते एकाच जातीचे आहेत, पण संघमित्राच्या
वडिलांना हा विवाह मान्य नव्हता. त्यांना पक्षाघाताचा झटका आला, नंतर एप्रिल २०२३ मध्ये त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर संघमित्रा व रोशन यांच्यात विसंवाद निर्माण झाला. सासरचे लोक छळ करत असल्याने त्यांना संपविण्याचा कट तिने रचला.
संपत्तीच्या वादामुळे मामी होती नाराज
तर रोशनची मामी रोजा रामटेके महागावातच राहते. रोशनला तीन मावशी आहेत. रोजा रामटेके हिच्या पतीच्या नावे असलेल्या चार एकर जमिनीवर रोशनची आई विजया यांच्यासह इतर तीन बहिणींनी दावा सांगितला होता, त्यामुळे रोजा यांच्या मनातही राग होता. त्यातूनच त्यांनी व संघमित्रा या दोघींनी मिळून संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा
कट अतिशय थंड डोक्याने आखला.
संघमित्रा कुंभारे हिने इंटरनेटवर सर्च करुन विना रंगाचे, दर्प न येणारे व हळूहळू शरीरात भिनणारे घातक द्रव परराज्यातून मागवल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. दोघी आरोपींनी नॉनव्हेज, डाळीतून तसेच पिण्याच्या पाण्यातही ते विषारी द्रव मिसळले व ते टप्प्याटप्प्याने कुटुंबातील लोकांना दिले. २० दिवसांत घरातील पाच जणांचा या विषप्रयोगात बळी गेला.
सध्या या प्रकरणात 3 जणांवर उपचार सुरू आहेत. रोशनच्या आई- वडिलांना दवाखान्यात नेणारा खासगी वाहनचालक राकेश अनिल मडावी ( रा.महागाव ) याच्यावर नागपूर, रोशनचा मावसभाऊ बंटी उंदीरवाडे (रा.बेझगाव ता.मूल जि.चंद्रपूर) याच्यावर चंद्रपूर तर रोशनच्या भावावर राहूल याच्यावर दिल्लीत उपचार सुरू आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या संपूर्ण कटात आणखी काहींचा सहभाग असल्याने त्याविषयी पोलीस अधिक तपास करत आहेत.