गडचिरोली : पोलीस भरतीत (Police Recruitment) सहभाग घेतल्याचा आरोप ठेवून एका तरुणाची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. अखेर गडचिरोली पोलिसांनी (Gadchiroli police) हत्या करणाऱ्या जहाल नक्षलवाद्यास (Naxalite) मंगळवारी अटक केली आहे. प्रकाश उर्फ देविदास उर्फ आडवे मुरे गावंडे (37) रा. मर्दहूर त. भामरागड (Bhamragarh) असे त्याचे नाव आहे. आतापर्यंत त्याच्यावर खून, चकमक, दरोडा, जाळपोळ असे 22 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
26 वर्षीय साईनाथ नरोटे हा मर्दहूर गावातील रहिवासी होता. तो सध्या सुरू असलेल्या पोलीस भरतीमध्ये सहभागी झाला होता. ही बाब नक्षलवाद्यांना माहीत होताच, गावातीलच नक्षलवादी मुरे याने त्याला घरून उचलून नेत गोळ्या घालून 9 मार्च रोजी त्याची हत्या केली. याप्रकरणी गडचिरोली पोलिसांच्या विशेष अभियान पथकाच्या जवानांनी तपास सुरू करून मोठ्या शिताफीने त्याला अटक केली.
प्रकाश गावडे हा सन 2000 मध्ये पेरमिली दलम मध्ये सदस्य पदावर भरती झाला होता. त्यानंतर प्लाटून दलम उत्तर गडचिरोली गोंदिया डिव्हिजन मध्ये त्याची बदली झाली. 2007-08 मध्ये सेक्शन डेप्युटी कमांडर पदावर तो कार्यरत राहून 2009 ते 2011 पर्यंत प्लाटून ए कमांडर या पदावर कार्यरत होता. जुलै 2011 ते फेब्रुवारी 2012 पर्यंत देवरी दलम कमांडर म्हणून कार्यरत होत.
प्रकाश गावडे याला पोलिसांना ताब्यात घेतल्यापासून त्याची कसून चौकशी सुरु आहे. आतापर्यंत त्याच्यावरती २२ गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर तिथल्या परिसरात मोठी दहशत होती अशी माहिती मिळाली आहे. त्याने तरुणाची हत्या केल्यापासून तो पुन्हा अधिक चर्चेत आला होता. परंतु पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफिने अटक केल्याची माहिती मिळाली आहे.
नक्षलवाद्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून तिथले स्थानिक खूश असल्याची माहिती मिळाली आहे. महत्त्वाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्यामुळे मोठी माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे.