नवी मुंबई : मनसे पदाधिकारी गजानन काळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे कोर्टानं फेटाळून लावला आहे. त्यामुळे गजानन काळे यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झालीय. काळे यांच्या शोधासाठी नवी मुंबई पोलिसांची 15 पथकं विविध भागात रवाना झाली आहेत. असं असलं तरी अद्याप गजानन काळेचा शोध लागू शकलेला नाही. काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून त्यांचा मोबाईल बंद आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काळे नवी मुंबई शहराबाहेर आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी 15 पथकं रवाना केली आहे. दरम्यान, काळेला लवकरात लवकर अटक केली जाईल, असा दावा पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी केलाय. (Gajanan Kale’s bail application rejected by Thane court)
दरम्यान, गजानन काळे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या त्यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. र्मिला वहिनींनी माझी सर्व बाजू ऐकून घेतली. त्या मला नक्की न्याय देतील, अशी प्रतिक्रिया संजीवनी काळे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी संजीवनी काळे यांनी आपल्या पतीवर घरगुती हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीचा खळबजनक आरोप केला होता. त्यानंतर नेरुळ पोलीस ठाण्यात गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून गजानन काळे फरार आहे.
या पार्श्वभूमीवर संजीवनी काळे गेल्या काही दिवसांपासून न्याय मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. संजीवनी काळे शनिवारी सकाळी आपल्या वडिलांसोबत राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी आल्या होत्या. मात्र, राज ठाकरे सध्या पुण्यात असल्यामुळे संजीवनी काळे यांना त्यांची भेट घेता आली नाही. त्यामुळे संजीवनी काळे यांनी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. शर्मिला ठाकरे यांनी माझी सर्व बाजू ऐकून घेतली. त्यांनी मला न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी प्रतिक्रिया संजीवनी काळे यांनी कृष्णकुंजमधून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिली.
राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून ते शनिवारी रात्री मुंबईत परतणार आहेत. संजीवनी काळे यांनी शर्मिला ठाकरे यांच्यापुढे आपले गाऱ्हाणे मांडले. शर्मिला ठाकरे यांनी त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. राजसाहेब आज रात्री मुंबईत येतील. त्यांच्याशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे मनसेच्या नेत्या रिटा गुप्ता यांनी सांगितले.
“2008 साली आमचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला. आम्ही कॉलेजात एकत्र होतो. आमची चांगली मैत्री होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पुढे त्याने मला लग्नाची मागणी घातली. मी आमच्या बौद्ध धर्मातल्या मुलाशी लग्न करणार असल्याचं त्याला सांगितलं. ‘मी बौद्ध धर्म स्वीकारतो, पण माझ्याशी लग्न कर’, असं त्याने मला सांगितलं. घरच्यांच्या संमतीने आम्ही लग्न केलं. लग्नानंतरच्या केवळ 15 दिवसांनी गजानन माझ्यासोबत किरकोळ कारणांवरुन भांडण करु लागला. माझा सावळा रंग व माझी जात याच्यावरुन तो मला टोमणे मारू लागला. जातीवाचक शिवीगाळ करु लागला… मारहाण करु लागला”
“तो मला कायम बोलायचा की, तू सावळी आहेस… तुझी जात वेगळी आहे… तरी देखील मी तुझ्याशी लग्न केले आहे. माझी चूक झाली. तुझ्या वडिलांची पोस्ट (हुद्दा) बघून मी तुझ्याशी लग्न केले, परंतु त्याचा मला काही एका फायदा झाला नाही, असं तो वारंवार बोलायला. तेव्हा आमच्या दोघांमध्ये या कारणांवरुन बऱ्याच वेळा भांडण झालं… जेव्हा जेव्हा भांडण होई त्यावेळी गजानन मला मारहाण करत असे. मग मी माहेरी जायचे. पुन्हा काही दिवस उटल्यानंतर गजानन मला फोन करुन माझी माफी मागायचा. पुन्हा असं होणार नाही, असं सांगून मला घरी आणायचा. पण काही दिवस सरले की त्याचं नाटक पुन्हा सुरु व्हायचं”, असंही त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
गजानन काळे यांच्याविरोधात गंभीर आरोप करत पत्नीकडूनच गुन्हा दाखल, मनसेत खळबळ
Video: गजानन काळेंच्या पत्नीवर सेटलमेंटसाठी दबाव? चित्रा वाघ म्हणतात, हे काय चाललंय राज्यात?
Gajanan Kale’s bail application rejected by Thane court