मैनपुरी : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्या लोकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून सिम कार्ड्स, एटीएम कार्ड्स आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. सायबर सेलने आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली असून, अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. युपीतील मैनपुरी परिसरात ही घटना उघडकीस आली आहे.
आरोपी एटीएम कार्ड मशिनमध्ये अडकावे यासाठी आधी एटीएममध्ये गम लावायचे. मग दुसरा आरोपी पीडित व्यक्तीला बोगस हेल्पलाईनवर कॉल करायचा सल्ला द्यायचा.
त्या नंबरवर कॉल केल्यानंतर कार्डशी संबंधित गोपनीय माहिती विचारायचा. त्यानंतर ग्राहकाला मूर्ख बनवून तांत्रिक पथक येईल असे सांगून तेथून पाठवून सर्जिकल ब्लेडच्या सहाय्याने कार्ड काढून इतर एटीएममधून खात्यातून पैसे काढायचे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आतापर्यंत आरोपींनी अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारे फसवणूक केली आहे. आरोपींकडून 75 हजार रुपये रोकड, 48 एटीएम कार्ड, 65 सिम कार्ड आणि 2 बेकायदेशीर पिस्तूल, 6 मोबाईल फोन आणि एक कार जप्त करण्यात आली आहे.
एटीएममध्ये कार्ड अडकल्याच्या आणि ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून येत होत्या. यानंतर सायबर सेलचे प्रभारी राजेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली टीम तयार करत तपास करण्यात आला. तपासानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.