पुणे / अभिजीत पोते : सुपर सॉनिक कॉन्सर्ट कार्यक्रमादरम्यान नागरिकांचे महागडे मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात विमानतळ पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी पाच आरोपींना पुणे शहरातील विविध ठिकाणाहून अटक केली आहे. आरोपींकडून 27 लाख रुपये किमतीचे 39 महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पुणे नगर रस्त्यावरील एका लॉन्समध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी चोरट्यांचा माग काढत मोठ्या शिताफीने त्यांना अटक केली.
पुणे नगर रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्स येथे 25 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय ‘सुपर सॉनिक लाईव्ह काँसर्ट’ आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. ही संधी साधून आरोपींच्या टोळीने कार्यक्रमात अनेकांचे महागडे मोबाईल चोरले. याप्रकरणी पोलिसांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
नागरिकांच्या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा नोंद करत पोलिसांनी तपास सुरु केला. चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी केली. अखेर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणे शहरातील विविध ठिकाणी सापळा रचून पाच आरोपींना बेड्या ठोकल्या. असद गुलजार महमंद, निजाम बाबू कुरेशी, शाहबाझ भोले खान, राहुल लीलिधर कंगाले आणि नदीम इब्राहिम मलिक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मालकाची 4 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पळणाऱ्या मॅनेजरला सिनेस्टाईल पाठलाग करून बुलढाण्यातील मेहकर पोलिसांनी पकडले. सिनेस्टाईल थराराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्ञानेश्वर विलास नागरिक असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मॅनेजरचे नाव आहे. बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील अतीयब पेट्रोल पंपाच्या मालकाचे पैसे लुटण्याचा मॅनेजरने प्रयत्न केला.