कोल्हापूर : विवाहेच्छुक तरुणांचा बनावट नवरीशी लग्न लावून मग नवरदेवाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड पोलिसांनी कारवाई करत पाच महिलांसह आठ जणांना अटक केली आहे. नवरी मुलगी फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. कुरुंदवाड परिसरातील दोन युवकांना लाखो रुपयांचा चुना या टोळीने लावला होता. यानंतर या तरुणांनी कुरुंदवाड पोलिसात धाव घेत फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीने राज्यभरात अनेकांना गंडा घातल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वर्षा बजरंग जाधव, संध्या विजय सुपनेकर, ज्ञानबा रामचंद्र दवंड ऊर्फ संतोष सुतार, विश्वजीत बजरंग जाधव, शारदा ज्ञानदा दवंड, दीपाली केतन बेलोरे आणि रेखा गंगाधर कांबळे अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
अटक आरोपींनी कुरुंदवाड परिसरातील दोन विवाह इच्छुक तरुणांची 24 ऑक्टोबर 2022 रोजी बनावट लग्न लावून फसवणूक केली होती. फसवणूक झाल्याचे उघड होताच दोन्ही तरुणांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
लग्नाचा बनाव करत आरोपींनी या तरुणांना 4 लाख 60 हजार रुपयांना गंडा घातला होता. तक्रार प्राप्त होताच कुरुंदवाड पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केले होते.
सहाय्यक फौजदार व्ही. आर. घाटगे, हेड कॉन्स्टेबल अनिल चव्हाण, सागर खाडे, पोलीस अंमलदार पूजा आठवले, ज्योती मुंडे यांच्या पथकाने कसून शोध घेत लग्न जमवणाऱ्या मध्यस्थीसह आठ आरोपींना अटक केले. नवरी मुलगी फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.