कल्याण : बनावट कागदपत्रे बनवून चुना लावणारे अनेक महाठग आपण बघतो. मात्र कल्याणात बनावट कागदपत्र (Bogus Document) तयार करुन थेट कोर्टाचीच फसवणूक (Cheating) करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. आधी बनावट दस्तऐवज करायचे मग त्याआधारे खोटे जामीनदारही उभे केले जायचे. या हेराफेरीची माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी 4 जणांना अटक (Arrest) केली आहे. या टोळीतील अन्य 2 जणांचा शोध सुरु आहे. विशेष बाब म्हणजे या टोळीत चार महिलांचा समावेश आहे. यापैकी तीन महिलांना अटक करण्यात आली आहे. सर्व महिला उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या आहेत. एक महिला फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत.
सिद्धार्थ नागवेकर, जस्मित कौर उर्फ डिंपल करतार सिंग गील, ममता अनुपम हजरा, गितिका सागर उदासी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना जामीनासाठी वेळेवर कागदपत्र मिळत नसल्याने या आरोपींची शिक्षा लांबते. अशा आरोपींच्या नातेवाईकांना हेरून त्यांना जामीनासाठी आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून देत त्यांच्याकडून 25 ते 30 हजार रुपये ही टोळी घेत होती.
उल्हासनगरमध्ये राहणारा सिद्धार्थ नागवेकर हा इतर तीन आरोपींबरोबर बनावट नाव पत्ता वापरून रेशनकार्ड, आधारकार्ड तसेच ग्रामपंचायतीच्या घरपट्टी तयार करून या बनावट कागदपत्रांच्या आधारे कल्याण न्यायालयात आरोपींना जामीन देत होता.
गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील आरोपींना 30 हजार रुपयात हे कागदपत्र उपलब्ध करून दिले जात होते. अशा प्रकारे गुन्हेगारांना जामीन देण्यासाठी ही टोळी स्वतः कोर्टाच्या आवारात हा गंभीर प्रकार करुन स्वतः चे खिसे गरम करत होती.
पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी कल्याण कोर्टात सापळा रचत चौघांना अटक केली. आरोपींकडून 5 ओळखपत्र, 3 रेशनकार्ड, 2 निवडणूक ओळखपत्र, 3 ग्रामपंचात घरपट्टीचे बनावट दस्तावेज आणि 5 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.
हे दस्तावेज बनवून देणाऱ्या दोन जणांच्या शोध पोलीस घेत आहेत. मात्र कोर्टाच्या आवारातच असा फसवणुकीचा प्रकार सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (Gang of defrauding court through forged documents arrested in Kalyan)