बदलापूर / निनाद करमरकर : ठाणे जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही गुन्हेगारी वाढली असून, याचदरम्यान बदलापूर शहरात बुधवारी एका तडीपार गुंडाने पोलिसांची झोप उडवली. या तडीपार गुंडाने तलवार घेऊन धिंगाणा घातला. त्यामुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आकाश धेंडे असे या गुंडाचे नाव आहे. त्याने धिंगाणा सुरू करताच परिसरात प्रचंड घबराट पसरली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन धेंडे याला ताब्यात घेतले आणि परिसरातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. आकाश धेंडे याला बदलापूर पश्चिम पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
बदलापूर पश्चिमेच्या उड्डाणपुलाच्या परिसरात हा खळबळजनक प्रकार घडला. आकाश धेंडे हा तडीपार गुंड हातात तलवार घेऊन नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना धमकावत होता. त्यामुळे परिसरातील सर्वच नागरिक प्रचंड दहशतीखाली होते. धेंडे याला वेळीच न रोखल्यास अनुचित प्रकार घडू शकतो, निष्पाप नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण केला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर सजग नागरिकांनी घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना गोपनीय खबर दिली.
ही गोपनीय खबर मिळताच बदलापूर पश्चिमेकडे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तडीपार गुंड धेंडे याला अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या तातडीच्या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला.
आकाश धेंडे याला याच महिन्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगड या चार जिल्ह्यांमधून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तरीही तो बिनधास्त बदलापूर परिसारत आला होता आणि तलवार हातात घेऊन धुडगूस घालत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर आता स्थानबद्धतेची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.