गौतमी पाटील यांची लावणी, प्रेक्षकांचा धिंगाणा आणि डेडबॉडीचं गूढ! सांगलीत नेमकं काय घडलं?

| Updated on: Nov 01, 2022 | 11:48 AM

लावणी कार्यक्रमात डेडबॉडी कुठून आली? गौतमी पाटील यांचा सांगलीतील कार्यक्रम वादात

गौतमी पाटील यांची लावणी, प्रेक्षकांचा धिंगाणा आणि डेडबॉडीचं गूढ! सांगलीत नेमकं काय घडलं?
सांगलीत नेमकं काय घडलं?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

सांगली : मिरज तालुक्यातील बेडग (Begad, Miraj) इथं लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी सुरु असल्याचा व्हिडीओ (Sangli Viral Video) समोर आलाय. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील (Gautami Patil) यांच्या लावणीच्या कार्यक्रमाचं आयोजन बेडग इथं करण्यात आलं होतं. धक्कादायक म्हणजे येथील शाळेच्या जवळच लावणी कार्यक्रमांचं व्यासपीठ तयार करण्यात आलं होतं. यावेळी प्रेक्षकांनी शाळेच्या छतावर आणि झाडावर बसून लावणी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. पण याचा फटका झाडासह शाळेलाही बसला.

पण यामुळे शाळेच्या कौलांचं तर नुकसाान झालंच. पण ज्या झाडावर प्रेक्षक बसले होते, ते झाडही कोसळल्यानं एकच गोंधळ उडाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लावणी कार्यक्रम परिसरातच एक मृतदेह आढळून आल्यानं सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली.

हे सुद्धा वाचा

सांगली जिल्ह्यातील बेडग इथं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सत्कार समारंभानंतर लावणीचा कार्यक्रम होणार होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. गौतमी पाटील हीच्यासह अन्य कलाकारांचं लावणी नृत्य पाहण्यासाठी सांगलीकर एकवटले होते.

लावणी कार्यक्रमात झालेल्या अफाट गर्दीवेळी काही प्रेक्षकांनी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढले. यावेळी शाळेच्या कौलारु छताचा चुराडा झाला. शाळेची कौलं फुटून नुकसान झालं. तसंच तार जाळीच्या कपांऊंडलाही फटका बसला.

दरम्यान, काही प्रेक्षक हे झाडावर बसले होते. प्रेक्षकांचा भार न पेलवल्यानं अखेर हे झाडंही कोसळलं. त्यामुळे आता शाळेच्या नुकसानीला जबाबदार कोणं, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरलही झाले आहेत. विशेष म्हणजे चक्क शाळेतील शिक्षकच या कार्यक्रमात ठुमके लगावताना दिसलाय.

व्हायरल व्हिडीओवरुन अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. आयोजक आणि शिक्षकांवर कारवाई केली जावी, अशी मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कुमार कांबळे यांनी केली आहे. पण हे प्रकरण इथंपर्यंत संपत नाही. याच कार्यक्रमाच्या परिसरात एक मृतदेहदेखील संशयास्पदरीत्या आढळून आला होता.

दत्तात्रय विलास ओमासे नावाची व्यक्ती मृतावस्थेत आढलून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. ओमासे हे गर्दीत खाली पडल्यामुळे तुडवले गेले असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहेत. या मृत्यूप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गौतमी पाटील यांच्या लावणीचा हा कार्यक्रमात सांगलीत आता चर्चेचा विषय ठरतोय. या कार्यक्रमावरुन अनेक सवालही उपस्थित केले जात आहेत. दत्तात्रय ओमासे यांच्या मृत्यूला नेमकं कोण जबाबदार, असा सवालही उपस्थित केला जातोय.